500 रुपयांच्या बंडलांचा डोंगर! नोटा ना खऱ्या, ना खोट्या, चौकशीत आढळले असे काही की…
Bundle of Notes Found in House : पोलिसांना कॉल आल्यावर ते धावतच घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल दिसले. या 500 रुपयांच्या नोटा होत्या. बंडलांचा ढीग या घरात सगळीकडं पडलेला दिसला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील (Uttara Kannada districts) दांदेली नगरातील (Dandeli City) एका घरात नोटांची बंडल सापडत असल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बघ्यांची एकच गर्दी उसळली. या घरात 500 रुपयांच्या नोटांचा ढीगच पडलेला होता. काही खाली बॉक्समध्ये सुद्धा नोटांची बंडल दिसत होती. तर खोलीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर नोटा विखुरलेल्या होत्या. सुरुवातीला अनेक तर्क-वितर्क देण्यात आले. या नकली नोटा असल्याचा दावा करण्यात आला. तर काहींनी येथे नोटा छापण्यात येत असल्याचे म्हटले. तर या नोटा ना खऱ्या आहेत ना खोट्या, त्या तर एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी वापरण्यात येत असलेल्या प्रॉप्स असल्याची माहिती समोर आली. आता पोलिसांना प्रश्न पडला की येथे तर चित्रपटाच्या शुटिंगविषयी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. मग येथे या नोटा आल्या कशा?
पोलिसांनी घेतली धाव
उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांदेली नगरातील एका घरात या नोटा दिसून आल्या. 500 रुपयांच्या या नोटांनी खळबळ उडवली. कोणीतरी पोलिसांनी या प्रकाराची माहिती दिली. पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी या घरात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडलं दिसून आली. कॉटवर मोठ्या प्रमाणात पैशांच्या नोटा होत्या. जवळच ठेवलेल्या एका बॉक्समध्ये बंडलांचा ढीग पडलेला होता. पण हे प्रकरण दुसरंच असल्याचे पोलिसांच्या थोड्याच वेळात तपास दरम्यान लक्षात आले.




गांधीनगर परिसरात ही घटना समोर आली. या नोटा नकली असल्याचा दावा करण्यात येत होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी नोटा निरखून पाहिल्या. त्यावेळी त्यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) लोगो नसल्याचे समोर आले. या नोटांवर भारतीय गव्हर्नरची स्वाक्षरी नसल्याचे पण आढळले. त्यामुळे या नोटा ना खऱ्या आहेत ना खोट्या असे पोलिसांच्या लक्षात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेविषयी माहिती दिली. त्यानुसार, या नोटांच्या मागील बाजूला या नोटा चित्रपटाच्या शुटिंगसाठी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या नोटांवर क्रमांकाची मालिका नाही. सीरीयल नंबर नाही. नकली नोटांवर एक सीरीयल नंबर असतो. पण या नोटांवर तसा सीरीयल नंबर नव्हते. त्यामुळे या नकली नोटा नसल्याचे स्पष्ट झाले.
भाडेकरूला घेतले ताब्यात
पोलिसांनी प्रकरणात येथे राहणार्या भाडेकरूला ताब्यात घेतले. या नोटा घरात कशा आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या का आणण्यात आल्या. त्याचा कशासाठी वापर करण्यात येणार होता, याचा पोलीस कसून शोध घेत आहे. या नोटांचा वापर कुणाला फसवण्यासाठी, बँकेला, व्यावसायिकाला गंडा घालण्यासाठी तर करण्यात येणार नव्हता ना, यादृष्टीने सुद्धा यंत्रणा तपास करत आहेत.