जगातला सर्वात महागडा आंबा कोणता, ज्याच्या किंमतीत कार विकत येईल
'ताइयो नो तमागो' म्हणजे जपानी भाषेत 'सूर्याचे अंडे' असा होतो. त्यांचा रंगही केशरी किंवा पिवळा नसतो तर लालबुंद असतो.
मुंबई : आंब्याचा सिझन सुरू झाला आहे. बाजारात अनेक आंब्याच्या पेट्या यायला लागल्या आहेत. आंब्याच्या चवीनूसार आणि त्याच्या उपलब्धतेनूसार त्याच्या किंमती ठरत असतात. अल्फान्सो पासून दशहरी, लंगडा, चौसा, पायरी, केशरी अशा अनेक जाती आहेत. आपल्याला तर रत्नागिरीच्या देवगडचा हापूस आंबा प्रिय आहे. परंतू त्याच्या पेक्षा महागडा आंबा तुम्हाला माहिती आहे का ? तर जगातल्या या महागड्या आंब्याचा रंग देखील निराळा आहे.
महाराष्ट्रात हापूस आंब्याला सर्वात जास्त मागणी असते. तसे उत्तर प्रदेशातील दशहरी सारखे आंबे चवीसाठी भाव खाऊन आहेत. परंतू जर आपण जगातल्या महागड्या आंब्याचा विचार केला तर त्याचे नाव ‘ताइयो नो तमागो’ आहे. अर्थातच नावावरून तुम्हाला कळलेच असेल की हा जपानचा आंबा आहे. जपानच्या मियाझाकी शहरात ही आंब्याची दुर्लभ जात पाहायला मिळते. ‘ताइयो नो तमागो’ म्हणजे जपानी भाषेत ‘सूर्याचे अंडे’ असा होतो.
जपानच्या दक्षिणेला असलेल्या मियाझाकी प्रांतात उष्ण आणि तीव्र सुर्यप्रकाश असलेल्या प्रांतात हा आंबा पिकवला जातो. ‘ताइयो नो तमागो’ आंबे हे त्यांच्या गोड अवीट चवीसाठी आणि नाजूक पणासाठी ओळखळे जातात. तसेच त्यांचा रंगही केशरी किंवा पिवळा नसतो तर जांभळ्या रंगाकडे झुकलेला असतो. हे जपानमधील ‘लक्झरी फळ’ मानले जाते. हे आंबे अत्यंत कमी प्रमाणात लागवड केले जातात. आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी ते झाडावरून हातानेच तोडून हातानेच पॅक केले जातात.
साल 2019 मध्ये ‘ताइयो नो तमागो’ चे केवळ दोन आंबे एका लिलावाड 5 मिलियन येन या रेकॉर्ड ब्रेक किंमतीत विकले गेले होते. म्हणजेच सुमारे 45,000 अमेरिकन डॉलरला ते विकले गेले होते. भारतीय रूपयांत विचार केला तर 36 लाख रूपयात ते विकले गेले. या आंब्यांना म्हणूनच खास काळजीपूर्वक उगवले जाते. या आंब्यांना पॅकींग करतानाही काळजी घेतली जाते. या आंब्याच्या पेटीवर त्याच्या दर्जाचे प्रमाणपत्र लावलेले असते. हे आंबे दरवर्षी केवळ मे ते जुलैपर्यंत उपलब्ध होतात. त्यांना खास व्यक्तींना गिफ्ट देण्यासाठीच वापरले जाते. या आंब्यांना लक्झरी दृष्टीनेच पाहिले जात असते.