“या” राज्यांसाठी वीज कनेक्शन करण्याची कटकट आता संपली! ई-मित्रवर मिळणार सोपी सेवा
सरकारी कार्यालयांच्या रांगेत उभं राहून वेळ वाया घालवतोय? आता गरज नाही! वीज कनेक्शनसाठी सुरू झाली एक अशी स्मार्ट सेवा, जी तुमचं काम घरी बसून, एका क्लिकमध्ये उरकून टाकेल. काय आहे ही डिजिटल यंत्रणा? आणि कशी वाचवेल तुमचा वेळ? चला, जाणून घेऊया

नागरिकांसाठी आता नवीन वीज कनेक्शन घेणं खूपच सोपं आणि झटपट होणार आहे. यापूर्वी नागरिकांना वीज कनेक्शनसाठी अर्ज, कागदपत्रे, वीज कार्यालयाच्या चकरा, आणि अनेक पायऱ्यांतून जावं लागत होतं. मात्र, आता हे सगळं टाळता येणार आहे. कारण राजस्थान सरकारने ‘ई-मित्र’ प्लॅटफॉर्मवर नवीन सुविधा सुरू केली आहे.
राज्यातील जयपूर, जोधपूर आणि अजमेर वीज वितरण कंपन्यांनी मिळून ही राजस्थान नागरिकांसाठी नवी प्रणाली सुरू केली असून, यामध्ये ‘न्यू कनेक्शन मॅनेजमेंट सिस्टम’ (NCMS) हे मॉड्यूल ‘ई-मित्र’शी जोडण्यात आलं आहे. यामुळे वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली प्रत्येक प्रक्रिया आता ऑनलाईन केली जाणार आहे.
कागदपत्रं कमी, वेळेची बचत
‘ई-मित्र’वरून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करता येईल, त्यानंतर डिस्कॉमच्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती, डिमांड नोट तयार करणे, फाईल तयार करणे यासारख्या गोष्टी सगळ्या ऑनलाईन पार पडतील. यामुळे ग्राहकांना उपविभागीय कार्यालयात वेळ वाया घालवण्याची गरज भासत नाही. हे सगळं ‘पेपरलेस’ पद्धतीने होणार असल्याने सिस्टीम अधिक पारदर्शक आणि जलद बनणार आहे.
साईट तपासणी सुद्धा डिजिटल
नवीन कनेक्शन मिळवण्यासाठी जागेची तपासणी करणे आवश्यक असते. यासाठी ‘साईट व्हेरिफिकेशन मोबाइल अॅप’ वापरून JEN (Junior Engineer) थेट जागेवर जाऊन मोबाईल अॅपमधून तपासणी नोंदवू शकतात. ही अॅप्लिकेशनदेखील NCMS प्रणालीशी जोडलेली आहे, त्यामुळे तपासणीसुद्धा आता पारदर्शकतेने आणि कमी वेळात पूर्ण होऊ शकते.
डिस्कॉम कार्यालयांची गरज संपली
डिस्कॉमच्या अध्यक्षा आरती डोगरा यांनी सांगितले की, ‘ई-मित्र’द्वारे अर्ज करणाऱ्या ग्राहकांना आता डिस्कॉमच्या कार्यालयात प्रत्यक्ष जावं लागणार नाही. सगळी प्रक्रिया डिजिटल झाल्याने ग्राहकांना विश्वासार्ह सेवा मिळेल आणि कोणतीही माहिती दडवली जाणार नाही.
पुढील टप्पे अधिक प्रगत
डिस्कॉम प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच इतर सेवा जसं की – कनेक्शनवरील नाव बदलणे, श्रेणी बदलणे, विद्युत भार वाढवणे किंवा कमी करणे हे देखील ‘ई-मित्र’वरून करता येईल. या बदलामुळे पेपरलेस सिस्टम अधिक मजबूत होईल, आणि प्रत्येक अर्जासाठी वेगळी फाईल तयार करण्याची गरज उरणार नाही.
थोडक्यात काय?
राज्य सरकारचा हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. नवीन वीज कनेक्शनची पूर्वी जिथे त्रासदायक प्रक्रिया होती, ती आता सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. एक अॅप किंवा ई-मित्र केंद्रावर जाऊन अर्ज करा आणि घरबसल्या वीज कनेक्शन मिळवा, तेही कुठल्याही अतिरिक्त धावपळीशिवाय!