देशाचे पंतप्रधान कोण ? वराने उत्तर दिलं नाही म्हणून सरळ लग्नच..
लग्न मोडण्याचे कारण सध्या चर्चेत आहे. मुलीच्या संमतीनेच हे लग्न ठरले होते, असे वराच्या वडिलांचे म्हणणे आहे. पण, कोणतेही विशेष कारण नसताना त्यांनी लग्न मोडले.
गाझीपूर : देशाच्या पंतप्रधानांचे नाव (prime minister of country) सांगता न आल्याने वधूच्या कुटुंबीयांनी सरळ लग्नच मोडल्याची घटना घडली आहे. या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने वधूकडच्या लोकांना वराला नावे ठेवली आणि लग्न करण्यास (marriage called off) नकार दिला. एवढेच नव्हे तर या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या वराच्या लहान भावाला पकडून जबरदस्तीने वधूशी लग्न करण्यास सांगितले. त्याने नकार दिल्यावर त्यांनी बंदूकीच्या धाकावर वधूचे त्याच्याशीच लग्न लावून दिले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील सैदपूर येथील आहे.
शिवशंकर असे वराचे नाव असून बसंत पट्टी येथे राहणाऱ्या रंजनासोबत त्यांचे लग्न ठरले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी परस्पर संमतीने हे लग्न निश्चित केले होते. सहा महिन्यांपूर्वीच तिलक समारंभही झाला होता. 11 जून रोजी लग्नाची तारीख ठरली होती. लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर तरुण आणि तरुणी दोघेही एकमेकांशी बोलायचे, गप्पा मारायचे.
मेहुणीने विचालेल्या प्रश्नामुळे वर गोंधळला
वधूचे वडील लाखेदू राम यांनीही मुलीच्या लग्नाची पूर्ण तयारी केली होती. वराने कुटुंबीयांसह वधूचे घर गाठले. सगळेच आनंदात होते, वरातीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर धूमधडाक्यात विधी पूर्ण होऊन वर वधूचे लग्नही लागले. सकाळी एक विधी असतो. त्यावेळी मेहुण्यांनी वराला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले. यामुळे वर थोडा अस्वस्थ झाला. त्याला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यावर नाराज झालेल्या वधूच्या कुटुंबीयांनी वराला नावे ठेवली आणि लग्न मान्य करण्यासही नकार दिला.
वराच्या पित्याने केले आरोप
हे लग्न मोडल्यामुळे वराचे कुटुंबीय संतापले. एवढेच नव्हे तर ज्याच्याशी लग्न ठरले होते, ते मोडून त्याच्या छोट्या भावाशी लग्न लावण्यात आल्याने अजूनच चिडले. त्या मुलाने लग्न करण्यास नकार दिल्यावर बंदूकीचा धाक दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
आमचा मुलगा खूप लहान आहे, त्याचे हे लग्नाचे वयही नाही, मात्र त्याला धमकी देण्यात आली. बंदूकीचा धाक दाखवून त्याचे लग्न लावण्यात आले, असे कुटुंबियांनी सांगितले. एवढा सगळा तमाशा झाल्यानंतर वर-वधू अखेर घरी आले असता, वधूची कुटुंबीय पुन्हा घरी आले आणि तिला जबरदस्तीने घरी नेण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र वराच्या कुटुंबियांचा संयम सुटला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.
लग्नात वाद झाला होता. मात्र, पोलिस ठाण्यात कोणीही लेखी तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार येताच कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.