रामपूरी चाकूवर बंदी का आली, कशामुळे झाली ही अनोखी कला नष्ट
तेव्हा चित्रपटातील व्हीलनचे सर्वात मोठे हत्यार चाकूच असायचे. प्रत्यक्षातही ज्याच्याकडे रामपूरी त्याला अख्खा एरीया घाबरून असायचा असा तो काळ होता. चित्रपटामुळे हा रामपूरी फेमस झाला. परंतू ...
मुंबई : साल 1965 मध्ये आलेल्या ‘वक्त’ चित्रपटातील अभिनेता राजकुमार यांचा एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. ज्यात ते व्हीलनला सुनावतात, ‘जानी …ये बच्चों के खेलने की चीज नहीं है, ‘ राजकुमार यांच्या हातातील तो रामपूरी चाकू फेमस झाला. रामपुरी चाकू हे त्या काळातील सिनेमातल्या व्हीलनचे सर्वात मोठे हत्यार होते. या रामपुरी चाकूला शंभर वर्षांचा इतिहास आहे. रामपूरी चाकूच्या वैशिष्ट्यपूर्ण बनावटीमुळे जगात रामपूरच्या कारागिरांना वेगळीच ओळख मिळाली. अचानक या रामपूरी चाकूची धार का गायब झाली अनेकांना रोजगार देणारा हा व्यवसाय का बंद झाला पाहूयात…
उत्तरप्रदेशातील लखनऊ पासून 322 किमीवर वसलेल्या रामपूरला कधी काळी साखर आणि कापसाच्या मिलसाठी ओळखले जात होते. परंतू या शहराला खरी ओळख रामपूरी चाकूनेच दिली आहे. शंभर वर्षांपासून नवाबाच्या काळापासून या शहराने चाकू बनविण्याच्या वारसा जपला होता. उत्तम कलाकुसर आणि मजबूती अशी रामपूरी चाकूची वैशिष्ट्ये होती. या चाकूची मूठ देखील वैशिष्ट्ये पूर्ण असायची तिलाही माशाचे, मोराचे, अनेक प्राणी आणि फुलांचे डीझाईन असायचे. काही चाकू बटण दाबताच झटकन उघडायचे तर काही चट…चट.. आवाज करीत उघडायचे. याच त्यांच्या वैशिष्ट्यामुळे रामपूरी चाकूचा प्रवेश हिंदी चित्रपटात झाला.
उत्तरप्रदेश सरकारची बंदी
चित्रपटातील नायकाप्रमाणे हा चाकू वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याने साल 1990 मध्ये उत्तरप्रदेश सरकारनेच 6 इंचापेक्षा अधिक पात्याच्या चाकूच्या विक्रीवर थेट बंदीच घातली. रामपूरचे कारागिर शाहवेज मियां म्हणतात ज्यामुळे हा चाकू प्रसिद्ध झाला त्या चित्रपटामुळे या चाकूचा शेवट झाला. पन्नास वर्षांच्या शहजाद आलम ज्यांच्या चार पिढ्या या व्यवसायात होत्या ते म्हणतात की 1980 चा तो काळ असा होता की रामपूरची अर्ध्याहून अधिक जनता चाकू बनविण्याच्या परंपरागत व्यवसायात होती.
रामपूरी चाकूचे स्मारक
सरकारची बंदी त्यानंतर बाजारात आलेले चायनीज चाकू यामुळे रामपूरीचा ऐतिहासिक वारसा असलेला व्यवसाय कायमचा बंद झाला. जेथे शेकडो दुकाने होती तेथे आता तीन चार दुकाने उरली आहेत.काही लोक रामपूरी चाकूची कला जोपसण्याचा प्रयत्न आजही करीत आहेत, परंतू त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी आहे. रामपूर शहराच्या मध्यभागी रामपूरी चाकूचे 20 फूटांचे स्मारक प्रशासनाने तयार केले आहे.