मुंबई : यंदा उन्हाळ्याने अंगाची लाही लाही होत आहे. तापमापकाचे ही डोके गरगरायला लावणा-या उष्णतेमुळे घर थंडा थंडा कूल कूल करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. उन्हाळा (Heatwave)सुरू होताच घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एअर कंडिशनरची (AC) मागणी वाढली आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात प्रमुख एसी कंपन्यांची(AC Companies) विक्री (AC Sales) विक्रमी पातळीवर पोहोचली असून, ती कायम राहण्याची शक्यता आहे.व्होल्टास, पॅनासोनिक, हिताची, एलजी आणि हायर या कंपन्यांनी गेल्या महिन्यात एसी विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली आहे. या उद्योगातील व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोविड -19 साथीच्या दुस-या लाटेमुळे(Covid – 19 Pandemic) मुळे विक्रीमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यावेळी प्रदुषण कमी असल्याने आणि बाहेर पडणे धोक्याचे असल्याने घरात एसीची एवढ्या प्रमाणात आवश्यकता जाणवली नाही. परंतू, कोरोनाची भीती कमी होताच, यंदा एप्रिलमध्ये एसीच्या विक्रीने एप्रिल 2019 च्या पूर्वी जो विक्रीचा आकडा होता तो गाठला आहे.
व्होल्टासचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रदीप बक्षी यांनी सांगितले की, एप्रिल 2022 मध्ये एसी उद्योगात विक्रीच्या बाबतीत गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत विलक्षण वाढ झाली आहे. गेल्या वर्षी तसा उन्हाळा फार जाणवला नाही. त्यामुळे विक्रीवर त्याचा थेट परिणाम दिसून आला. विक्रीत घट नोंदवण्यात आली होती. यंदा मात्र उलट स्थिती आहे. यंदा उन्हाळ्याने सर्वसामान्यांचा घामाटा काढला आहे. तर या वाढत्या तापमानामुळे एसी कंपन्यांच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात झालेली ही वाढ कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे. परिणामी यंदा विक्रीत 100 टक्के अधिक वाढ झाली आहे.
पॅनासॉनिक इंडियाचे बिझनेस हेड गौरव साहा यांनी सांगितले की, कंपनीने यंदा विक्रमी मागणी नोंदवली असून एप्रिल महिन्यात एक लाखांहून अधिक एसीची विक्री केली आहे. एअर कंडिशनरची यंदा विक्रमी मागणी आहे.
पॅनासॉनिक इंडियाने या एप्रिलमध्ये 1 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली, जी एप्रिल 2021 च्या तुलनेत 83 टक्क्यांनी वाढली आहे आणि एप्रिल 2019 च्या तुलनेत 67 टक्क्यांनी जास्त आहे.
याशिवाय हिताची ब्रँड नावाने एसीची विक्री करणाऱ्या जॉन्सन कंट्रोल्स-हिताची एअर कंडिशनिंग इंडियाची विक्री एप्रिल 2021च्या तुलनेत गेल्या महिन्यात जवळपास दुप्पट झाली आहे. या श्रेणीत जास्तीत जास्त उन्हाळ्याच्या हंगामात विक्रमी 1500 कोटी रुपयांची विक्री होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.