सावधान! तुमचेही एकापेक्षा अधिक बँकेत खाते आहे? …तर तुम्हाला बसू शकतो मोठा आर्थिक फटका
जर तुमचेही एका पेक्षा अधिक बँकेत खाते असतील तर वेळीच सावध व्हा. ज्या बँक खात्यात तुमचे व्यवहार होत नाहीत, किंवा कमी आहेत ती बँक खाती बंद करा. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
विजय सतत नोकरी (Job) बदलत असतो त्यामुळे त्याचे एकापेक्षा जास्त बँकेत (Bank) खाते आहेत. नुकताच तो आयटीआर (RTR) फाईल करण्यासाठी सीएकडे गेला. त्यावेळी सीएनं सर्व बँकेचे स्टेटमेंट मागितले. त्यावेळी विजय आश्चर्यचकित झाला. अनेक बँकांमध्ये खाते असल्यानं त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. तुमचीही एकापेक्षा जास्त बँकेत खाती असल्यास वापरात नसलेली खाती तात्काळ बंद करा, अन्यथा किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल तुमच्याकडून दंड आकारला जातो हे लक्षात ठेवा, सहसा, तीन महिने पगार न मिळाल्यास, बँका पगार खात्याला सामान्य बचत खात्यात रूपांतरीत करतात. विजयने पूर्वीच्या संस्थांमध्ये काम करताना उघडलेली पगाराची खाती आता बचत खात्यात रुपांतरीत झाली आहेत. आता या बचत खात्यांवर विविध प्रकारचे सेवा शुल्क आकारले जात आहे. यासोबतच किमान शिल्लक न ठेवल्यास दर तिमाहीला दंडही आकारण्यात येतोय.
किमान रक्कम ठेवण्याची समस्या
जर तुमची चार बँक खाती असतील, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी समस्या किमान शिल्लक राखण्याची असेल. जर प्रत्येक बँकेत किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10,000 रुपये असेल, तर अशा परिस्थितीत 40,000 रुपये फक्त किमान रक्कम ठेवण्यातच अडकून पडतील. तुम्ही असे संतुलन राखले नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागतो. मिनिमम बॅलन्सशी संबंधित शुल्कात प्रचंड वाढ झाली असल्याने, एका वर्षात कोणत्याही एका बँक खात्यातून 3000 रुपयांपर्यंतची रक्कम कापली जाऊ शकते. खात्यांमध्ये पैसेच ठेवले जात नसल्याने अनेक बँका दंड आकारून दंड वसूल करत राहतात. तुम्हाला भविष्यात कधीही यासाठी दंड भरावा लागू शकतो.
डेबिट कार्ड सेवांसाठीही शुल्क
बँक खाते उघडल्यानंतर बँक डेबिट कार्ड देऊन या बदल्यात 100 ते 200 रुपये वार्षिक शुल्क आकारते. तुमचे चार बँकेत खाती असल्यास या सर्व बँक खात्यांवर नियमित शुल्क लागत असते. तुमच्या खात्यात पैसे नसल्यास व्याजासहित शुल्क वसूल करण्यात येते. आजकाल जवळपास सर्वच बँका एसएमएससाठी शुल्क आकारतात. काही बँका नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरण्यासाठी शुल्क देखील आकारतात. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवताना चेकद्वारे व्यवहार केल्यास शुल्क भरावं लागतं. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा एटीएम वापरल्यासही बँका शुल्क आकारतात.
आयकर रिटर्न भरताना अडचणी
आयकर रिटर्न भरताना करदात्याला त्याच्या सर्व बँक खात्यांचे खाते क्रमांक द्यावे लागतात. आर्थिक वर्षात या सर्व खात्यांमध्ये शिल्लक राखून IFSC कोड आणि कमावलेल्या व्याज उत्पन्नाचा तपशील देखील द्यावा लागेल. एकापेक्षा जास्त बँक खाती असल्याने देखील ITR फाइल करणे कठीण होते. तुमच्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांची शिल्लक आणि या खात्यांमध्ये मिळणारे व्याज दाखवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी बँक स्टेटमेंट काढावं लागतं. तुमचे बँक खाते निष्क्रिय असल्यास तुम्हाला बँकेकडून स्टेटमेंट मिळवण्यात अडचणी येतात. ही समस्या टाळण्यासाठी, नवीन बँकेत खाते उघडण्यापूर्वी तुमचे पूर्वीचे बँक खाते आवश्यक आहे की नाही याचे विश्लेषण करा. खूप जास्त बँक खाती असण्यात अर्थ नाही. आजकाल ज्या बँक खात्यांमध्ये कमी व्यवहार होतात त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे अशी खाते वेळीच बंद करा.