Gold Hallmarking : सोन्याला ‘शुद्धते’ची झळाळी! हॉलमार्कशिवाय सोने विक्रीला मनाई
सोने खरेदी-विक्रीसाठी आता नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. 1 जूनपासून हा नियम लागू होणार असून त्यामुळे सोन्याच्या शुद्धतेची हमी मिळणार आहे. ज्वेलर्स आता ग्राहकांना हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाहीत, पण तरीही ग्राहक आपले जुने दागिने पूर्वीप्रमाणेच ज्वेलर्सला हॉलमार्कशिवाय विकू शकणार आहेत.
अडचणीच्या काळात सोन्याइतका दुसरा भरोशाचा मित्र नाही. अनेक भारतीय कुटुंब आजही परंपरागत पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर आणि शुभ मानली जाते. काळ कोणताही असो सोन्यातील गुंतवणुकीला भारतीयांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच नोटाबंदी असो वा लॉकडाऊन, अडचणीत सापडलेल्या गुंतवणुकदारांना सोन्याचा भाव (Gold Price) आला. अनेकदा सोन्यासारखी मौल्यवान वस्तू मिळवण्यासाठी तुम्ही ओळखीच्या दुकानदारावर अवलंबून राहता. मात्र, तुमच्या विश्वासाला अनेक वेळा तडा जातो. 22 कॅरेट सोने (22 Carat Gold) असल्याचा दावा करत कमी कॅरेटचे दागिने माथी मारल्या जातात . पण कदाचित आता तसे होणार नाही. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींचे अनिवार्य हॉलमार्किंग (Gold Hallmarking) करण्याचा दुसरा टप्पा यावर्षी 1 जूनपासून सुरू होत आहे.
पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, हॉलमार्किंग अनिवार्य करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात, सोन्याच्या दागिन्यांचे तीन अतिरिक्त कॅरेट, 20, 23 आणि 24 कॅरेट शिवाय 32 नवीन जिल्हे तयार केले जातील. जिथे पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर तपासणी आणि हॉलमार्क केंद्र (AHC) स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर 16 जून 2021 पर्यंत हॉलमार्किंगचा नियम ऐच्छिक होता. ज्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने सोन्यासाठी अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्हे त्याच्या कक्षेत आणण्यात आले. जिथे दररोज 3 लाखांहून अधिक सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क लावले जात आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बीआयएसच्या( BIS) तरतुदीनुसार, सामान्य ग्राहक बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त एएचसीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता देखील तपासू शकतो.
ग्राहकांवर काय परिणाम होईल?
आता त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात. गोल्ड हॉलमार्किंगचे नियम फक्त ज्वेलर्ससाठी आहेत. हे ग्राहकांना लागू होत नाहीत. ज्वेलर्स आता ग्राहकांना हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाहीत, पण तरीही ग्राहक आपले जुने दागिने पूर्वीप्रमाणेच ज्वेलर्सला हॉलमार्कशिवाय विकू शकतो. त्यामुळे ग्राहकावर याचा फारसा परिणाम होणार नाही. AHC प्राधान्याने सर्वसामान्य ग्राहकांकडून सोन्याच्या दागिन्यांची चाचणी करून ग्राहकांना चाचणी अहवाल देणार आहेत. ग्राहकाला देण्यात आलेल्या चौकशी अहवालामुळे ग्राहकाला त्यांच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत खात्री मिळेल आणि ग्राहक घरी असलेले दागिने विकू इच्छित असल्यास त्यालाही या योजनेचा उपयोग होईल. आता सोन्याच्या दागिन्यांच्या चाचणीचा खर्चही जाणून घेऊयात.
किती शुल्क आकारणार?
रिपोर्टनुसार, 4 वस्तूंपर्यंतच्या सोन्याच्या दागिन्यांच्या टेस्टिंगसाठी 200 रुपये शुल्क आकारले जाईल. 5 किंवा त्यापेक्षा अधिक वस्तूंचे शुल्क प्रति वस्तू 45 रुपये आहे. ग्राहकांनी खरेदी केलेल्या एचयूआयडी क्रमांकासह (HUID Number) सोन्याच्या दागिन्यांची सत्यता आणि शुद्धताही बीआयएस केअर अॅपमध्ये ‘व्हेरिफाइड एचयूआयडी’चा वापर करून पडताळून पाहता येईल, असे अहवालात म्हटले आहे.