नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डिजिटल हेल्थ मिशन (PM-DHM) राष्ट्रीय स्तरावर लाँच केले. पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना राबवण्यात आली. आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB PM-JAY) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनला राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला आहे.
पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशनमध्ये प्रत्येक व्यक्तीला 14 क्रमांकांचा एक युनिक हेल्थ आयडी दिला जाईल. हा क्रमांक संबंधित व्यक्तीला हेल्थ आयडी असेल. व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती राष्ट्रीय आरोग्य आयडीमध्ये दिली जाईल. हेल्थ आयडीच्या मदतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदी त्यांच्या संमतीने मिळवता येतील.
या कार्डमध्ये संबंधित रुग्णाच्या प्रत्येक चाचणीचा, प्रत्येक आजाराचा तपशील, ज्या डॉक्टरांना ते दाखवण्यात आले आहे, घेतलेली औषधे आणि निदान यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असेल. नवीन ठिकाणी रुग्णावर उपचार करताना ही माहिती अत्यंत उपयोगी ठरेल.
तुम्ही हेल्थ आयडी पोर्टलवर जाऊन स्वत: नोंदणी करु शकता. अथवा मोबाईलवर आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्याठिकाणी तुम्ही स्वत:ची नोंदणी करु शकता. याशिवाय, तुम्ही रुग्णालये आणि सामाजिक स्वास्थ्य केंद्रात जाऊनही तुमचा हेल्थ आयडी तयार करु शकता.
हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग, घराचा पत्ता इत्यादी तपशील भरावे लागतील. तुम्ही आधार, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यांच्या साहाय्याने युनिक हेल्थ आयडी निर्माण करु शकता.
हेल्थ आयडीसाठी आधारकार्ड सक्तीचे नाही. तुम्ही स्वत: मोबाईल नंबर आणि वैयक्तिक तपशील देऊनही हेल्थ आयडी निर्माण करु शकता. तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डाशी लिंक नसेल तर तुम्ही नजीकच्या रुग्णालयात किंवा संबंधित संस्थेत जाऊन हेल्थ आयडीसाठी नोंदणी करु शकता. हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला सध्या आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाची गरज आहे. मात्र, आगामी काळात पॅनकार्ड, वाहनचालक परवाना आणि अन्य कागदपत्रांचा वापर करुनही हेल्थ आयडी तयार करता येईल.
तुमचा हेल्थ आयडी हा युनिक असेल. त्यामुळे तुम्ही आरोग्याशी संबंधित सर्व तपशील या हेल्थ आयडीशी जोडू शकता. हेल्थ आयडीच्या नोंदणी प्रक्रियेसाठी फक्त 10 मिनिटांचा अवधी लागतो. वैयक्तिक तपशील भरल्यानंतर मोबाईल क्रमांक किंवा आधारकार्डाच्या माध्यमातून तुमची पडताळली केली जाईल.
तुम्ही हेल्थ आयडी पोर्टलवर लॉगीन करताना पासवर्ड विसरलात तर मोबाईलवर मिळणाऱ्या ओटीपीच्या साहाय्यानेही लॉग इन करु शकता. तुम्हाला योजनेचा कारभार न पटल्यास तुम्ही केव्हाही आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) योजनेतून बाहेर पडू शकता. नंतरच्या काळात तुम्ही पुन्हा योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी हेल्थ आयडी परमनंट आणि टेम्पररी डिलीट करणे, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.
* सर्वप्रथम https://nha.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
* त्याठिकाणी NDHM ID App वर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मच्या बटणावर क्लिक केल्यास तुम्हाला फॉर्म दिसू लागेल.
* या अर्जात नाव, मोबाईल क्रमांक असे वैयक्तिक तपशील भरा.
* त्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा.
* यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल, त्या साहाय्याने व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
* त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
संबंधित बातम्या:
आधारकार्डाप्रमाणे तयार होणार तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड, कशाप्रकारे करणार काम, जाणून घ्या सर्वकाही