आयोध्या : प्रभू श्रीरामांची (Shriram) पावन भूमी पुन्हा एकदा लक्ष लक्ष दिव्यांनी (Lights) उजळून निघणार आहे. यंदाच्या या प्रकाश पर्वात आतापर्यंतचे दिवे लागणीचे सर्व रेकॉर्ड तुटणार आहेत. या प्रकाश पर्वात न्हाऊन निघण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्ही आयोध्येत जाऊन या पर्वाचे साक्षीदार होऊ शकता अथवा विहंगम सोहळा ‘याची देही याची डोळा’ टिव्हीवरही पाहू शकता..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा आयोध्येतील दीपोत्सवात सहभागी होणार आहेत. हा सोहळा मेगा इव्हेंटच राहणार नाही, तर एक आणखी जागतिक विक्रम करणार आहे. कारण या सोहळ्यात गेल्यावर्षींपेक्षा किती तरी लाख दिवे प्रकाशाचे साक्षीदार होणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2017 मध्ये आयोध्या दीपोत्सवाची सुरुवात केली. हा सहावा दीपोत्सव आहे. 23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दीपोत्सवात सहभागी होत आहे.
या दीपोत्सवात यावेळी 15 लाखांहून अधिक दिवे लावून नवीन जागतिक विक्रम करण्यात येणार आहे. त्यासाठी 17 लाख दिवे लावण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 17 लाख 50 हजार दिव्यांची खरेदी करण्यात आली आहे.
40 मिलीलीटरचे हे दिवे असतील. त्यासाठी 3500 लीटर मोहरीचे तेल वापरण्यात येणार आहे. हा एक विश्व विक्रम असेल. या दिव्यांमुळे शरयूचा घाट प्रकाशाने न्हाऊन निघणार आहे. हे विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक आयोध्येत पोहचणार आहेत.
या प्रकाशपर्वासाठी 22 हजार स्वयंसेवक प्रशासनाच्या दिमतीला असतील. हा सोहळा टिपण्यासाठी जगभरातील यात्रेकरु, प्रवाशी, पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यावेळी शरयूचा घाट दिव्यांच्या प्रकाशांनी आणि माणसांनी फुलून जाणार आहे.