आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट करायचे आहे ? UIDAI चे नवीन नियम पाहा काय ?
आधारकार्डच्या नवीन नियमांनुसार आधारकार्डधारक आता ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडद्वारे आपली माहिती अपडेट करू शकतात. सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी (CIDR) मधील माहितीचे अपडेट एक तर जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन किंवा मोबाइल एप्लिकेशन आणि UIDAI वेबसाइटद्वारे केले जाऊ शकते.
नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : तुम्हाला तुमचे आधारकार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा नावात बदल करायचा आहे, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI ) आधारची नोंदणी आणि अपडेट ( नुतनीकरण ) नियमात बदल करण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केला आहे. आधारची नोंदणी आणि अपडेट करण्यासाठी नवीन फॉर्म जारी केले आहेत. जर कोणाला नवीन आधारकार्ड काढायचे असेल किंवा अपडेट करायचे आहे. त्यांना आता नवा अर्ज भरावा लागणार आहे. अनिवासीय भारतीयांसाठी स्वतंत्र फॉर्म भरावा लागणार आहे.
आधारकार्डाचा डेमोग्राफिक डाटा उदा. नाव, पत्ता आदी अपडेट करणे नव्या नियमांमुळे आता अगदी सोपे होणार आहे. नवीन नियम केंद्रीय ओळख डाटातील माहीती अपडेट करण्याचे दोन मार्ग सांगत आहेत. एक म्हणजे वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने किंवा दुसरे म्हणजे आधार नोंदणी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ऑनलाईन अपडेट
जुन्या नियमात ऑनलाईन पद्धतीने आधारकार्डातील आपला पत्ता आणि अन्य माहीती अपडेट करण्याची सुविधा होती. इतर बाबींना अपडेट करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रांवर स्वत: ला जावे लागत होते. परंतू नवीन नियमात आता खूप सारी माहीती ऑनलाईन देखील अपडेट करता येणार आहे. भविष्यात आपला मोबाईल क्रमांक देखील ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवीन फॉर्मची सुविधा
आधारकार्ड नोंदणी आणि माहीती अपडेट करण्याचा सध्याचा फॉर्म नव्या फॉर्ममध्ये बदलण्यात आला आहे. नवीन फॉर्म क्रमांक 1 चा उपयोग आधार नोंदणीसाठी 18 वर्षे ते अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आणि अनिवासी भारतीयांसाठी होणार आहे. एका वर्गवारीच्या व्यक्ती माहीती अपडेट करण्यासाठी एकाच प्रकारचा फॉर्मचा वापर करु शकते.
एनआरआय व्यक्तींसाठी देखील स्वतंत्र अर्ज
ज्या एनआरआय व्यक्तींकडे ( अनिवासीय भारतीय ) भारताच्या बाहेरी रहिवासाचा पुरावा आहे. त्यांना आधार नोंदणी आणि अपडेटेशन साठी फॉर्म 2 चा वापर करावा लागणार आहे. ज्यांचे वय 5 वर्षे आणि 18 वर्षांदरम्यान आहे आणि त्यांच्याकडे भारतीय पत्ता आहे अशा एनआरआय व्यक्ती फॉर्म 3 चा वापर करू शकणार आहेत. फॉर्म 4 चा वापर विदेशी पत्ता असलेली एनआरआयची मुले करु शकणार आहेत. याच प्रकारे 5,6,7,8 आणि 9 पर्यंतचे फॉर्म वेगवेगळ्या कॅटगरीची लोक करु शकणार आहेत.