PF मधून पैसे काढणाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळते पेन्शन? काय आहे नियम
EPFO Pension : तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर ईपीएफओ अंतर्गत निवृत्तीनंतर पेन्शन मिळते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कर्मचाऱ्यांना अनेक कारणासाठी पीएफमधून रक्कम काढावी लागते. कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी पीएफमधून रक्कम काढली होती.
पीएफ खात्यातून रक्कम काढणाऱ्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते का? असा सवाल तुमच्या पण मनात घोंगावतोय का? जर तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल का? याविषयीचा नियम सांगतो तरी काय? तर या प्रश्नाचे उत्तर एका अटीनुसार होय असे आहे. तुम्ही म्हणत असाल अशी कोणती ही अट आहे. तर ही अट सेवेसंबंधीची आहे. जर तुम्ही कमीत कमी 10 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र होता.
58 व्या वर्षी पेन्शनसाठी क्लेम केल्यास..
EPFO मध्ये प्रत्येक महिन्याला मूळ वेतनावर 12 टक्के वाटा जमा होतो. यामध्ये 8.3 टक्के वाटा हा PF खात्यात तर 3.67 टक्के वाटा EPF योजनेत जमा करण्यात येतो. EPF योजनेत जमा रक्कम कालावधी पूर्ण झाल्यावर पेन्शन रुपाने देण्यात येते. 50 वर्षानंतर EPF खातेधारक पेन्शनसाठी क्लेम, दावा करु शकतात.
जर कोणी व्यक्ती 58 वर्षांपूर्वी निवृत्तीसाठी दावा करत असेल, तर प्रत्येक वर्षी 4 टक्क्यांची कपात करण्यात येते. निवृत्तीनंतर EPF फंडमध्ये जमा पैशातील, 75 टक्के एकरक्कम मिळते. तर 25 टक्के रक्कम ही निवृत्ती रक्कम म्हणून दर महिन्याला मिळते.
10 वर्षांत नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळण्यासाठी पात्र
जर कर्मचारी EPFO मध्ये दरमहा योगदान देत असेल आणि त्याने 10 वर्षे नोकरी केली तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो. ही पेन्शन त्याला वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात येते. 50 वर्षानंतर सुद्धा पेन्शन मिळू शकते. पण त्यामध्ये नियमानुसार कपात होते.
आता एटीएमद्वारे काढा पीएफ
लवकरच कर्मचाऱ्यांना एटीएममधून पीएफचा पैसा काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सध्या तांत्रिक कारणासाठी वा इतर कारणांमुळे पेन्शन दावा फेटाळण्याचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांन आळा घालण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येणार आहे. हे बँकेचे कार्ड नसेल तर पीएफ खात्याकडून कर्मचाऱ्यांना हे एटीएम कार्ड देण्यात येईल. ते कुठल्याही एटीएम कार्डमध्ये वापरता येईल. रक्कम काढता येईल. त्याचा वापर, त्याची मर्यादा याविषयीची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
12 टक्क्यांची मर्यादा हद्दपार
सरकार पीएफ खात्यातील योगदानासाठी सध्या असलेली 12 टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा विचार करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कर्मचार्याला त्याच्या बचतीच्या सवयीनुसार पीएफ खात्यात बचतीचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी त्याच्या मनाने कितीही टक्के योगदान जमा करण्यास पात्र असेल. पण त्याच्या पगारानुसार हे योगदान त्याला जमा करता येणार आहे. पगार इतके योगदान त्याला जमा करता येणार नाही.