हीच ती वेळ स्वप्नातील घर सत्यात उतरवण्याची, बांधकाम साहित्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या नवे भाव
आता घर बांधणे स्वस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य वाळू, सिमेंट, विटा आणि सळ्यांच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहेत. जाणून घेऊयात नवे दर
मुंबई : प्रत्येकाच्या मनात घराची एक संकल्पना असते. तुमच्या स्वप्नातील घर सत्यात उतरवण्याची हीच योग्य वेळ आहे. पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणारा अबकारी कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेलचे दर (Diesel Petrol Price Cut) स्वस्त झाले आहेत. दुसरीकडे स्टीलच्या निर्यातीवर आकारण्यात येणारा उच्च कर (Steel Export Duty) आणि तोंडावर आलेला पावसाळा यामुळे तुमचे स्वप्नातील घर अधिक स्वस्त दरात निर्माण होऊ शकते. स्टीलच्या निर्यातीवर सध्या अधिक कर आकारण्यात येत असल्याने परिणामी निर्यातीवर बंधने आली आहेत. त्यामुळे स्टील स्वस्त झाले आहे. दुसरीकडे घर बांधण्यासाठी आवश्यक मुलभूत गोष्टी जसे सळ्या, सिमेंट (Cement Rate), वाळू आणि विटांचे दर देखील घसरले आहेत. त्यामुळे आता नवीन घर बांधण्यासाठी अनुकूल काळ निर्माण झाला आहे.
20 हजारांपर्यंत कमी झाला सळ्यांचा रेट
केंद्र सरकारकडून स्टील निर्यात शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशात स्टील उत्पादनाचे दर झपाट्याने घसरले आहेत. घर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सळ्यांचे दर देखील प्रचंड स्वस्त झाले आहेत. एप्रिल महिन्यात सळ्यांचा रेट 82 हजार रुपये प्रति टन एवढा होता. तर आता त्यामध्ये घसरण झाली असून, सळ्यांचा भाव 62 ते 63 हजार रुपये प्रति टनावर पोहोचला आहे. तर उच्च प्रतिच्या सळ्यांचा भाव 92 ते 93 हजार रुपये टन एवढा आहे. सळ्यांचे भाव गेल्या एका महिन्यात जवळपास वीस हजार रुपयांनी घसरले आहेत.
सिमेंटच्या दरात घसरण
गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये सिमेंटच्या दरात देखील घसरण पहायला मिळत आहे. सिमेंटचा दर प्रति बॅग 60 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. बिर्ला उत्तम सीमेंटची एक बॅग पूर्वी चारशे रुपयांना मिळत होती. तीच्या भावात वीस रुपयांची घसरण झाली असून, ती 380 रुपयांवर पोहोचली आहे. बिर्ला सम्राटचा भाव 440 वरून 420 रुपयांवर पोहोचला आहे. एसीसी सिमेंटचा दर 450 रुपयांहून 440 रुपयांवर पोहोचला आहे. सिमेंटप्रमाणेच वाहू आणि विटांचे दर देखील स्वस्त झाले आहेत.
पेट्रोल, डिझेलमुळे स्वस्त झाले सिमेंट
देशात महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्राने पेट्रोल, डिझेलच्या एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. एक्साइज ड्यूटी कमी केल्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. इंधन स्वस्त झाल्याने वाहतूक खर्च देखील कमी झाला आहे. त्यामुळे सिमेंटच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. दुसरीकडे स्टीलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हा काळ घर बांधण्यासाठी अनुकूल असून, तुम्ही खर्चात मोठी बचत करू शकता.