मुंबईत एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या मंगेशनं ऑफिसच्या जवळच 60 लाख रुपयांत रिसेलमध्ये फ्लॅट (Flat) खरेदी करण्याचा व्यवहार केला.अॅग्रीमेंट झाल्यानंतर 10 टक्के बयाना रक्कमही दिली. मात्र, या फ्लॅटच्या वाटपावरून दोन भावांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे रजिस्ट्री (Registry) होऊ शकली नाही. मंगेशनं ज्याला पैसे दिले होते, तो आता पैसेही परत देत नाही. मुळात मंगेशनं फक्त एजंटच्या विश्वासावर व्यवहार केला. घर खरेदी करताना बरेच जण अशीच चूक करतात. एजंटच्या माहितीवर डोळे बंद ठेऊन विश्वास ठेवतात आणि अॅग्रीमेंट (Agreement) करतात. ग्राहकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत एजंट वादग्रस्त संपत्तीचा व्यवहार करतात. त्यानंतर खरेदीदार अडचणीत येतो. बऱ्याचदा अॅग्रीमेंट करताना एजंट जुन्याच करारामध्ये मोडतोड करतो. त्यामुळे नको असलेल्या अटी, शर्थी अॅग्रीमेंटमध्ये असतात. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
खरेदी केलेल्या संपत्तीमुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी व्यवहार करण्याआधी एखाद्या चांगल्या वकीलाकडून सल्ला घ्या. वकील तुम्हाला संपत्तीच्या कायदेशीर हक्काविषयी माहिती देऊ शकतो. यासाठी थोडासा खर्च करावा लागला तर आवश्य करा. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर आणि बचतीतून आपण घर खरेदी करत असतो. घर खरेदीसाठी कर्ज घेतलं असल्यास भविष्यातील बचतीचा मोठा हिस्सा ईएमआयच्या रुपात जाणार असतो. त्यामुळे बहुतांश लोकांसाठी घर खरेदी ही जीवनातील एकमेव गुंतवणूक असते. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसंबंधात अत्यंत क्लिष्ट कायदे आहेत. काही वेळेस तर तज्ज्ञांनाही धोका होतो.
घर खरेदी करताना तुम्ही गृहकर्ज घेतलं असल्यास तुम्ही काही प्रमाणात सुरक्षित होता. कर्ज देण्यापूर्वी बँक संपत्ती संदर्भातील कायदेशीर मालकी तपासणी करतात. विक्रेत्याकडे कायदेशीर हक्क आहे का? तसेच संपत्तीवर कर्ज आहे की नाही याची चाचपणी बँकेकडून करण्यात येते. मात्र, बँकचे काम एका मर्यादेपुरतेच असते. अशावेळी संपत्ती संदर्भात कायदेशीर सल्ला चांगल्या वकिलाकडून घ्यावा. कायदेशीर सल्ला घेतल्यास भविष्यातील मानसिक आणि आर्थिक त्रासातून तुमची मुक्तता होते. एखाद्या असाध्य आजारात आपण बऱ्याचदा डॉक्टरांचा सेकेंड ओपोनियन घेता. त्याचप्रमाणे संपत्ती खरेदी करतानाही सेंकड ओपोनियन घ्या. कर्ज देणाऱ्या बँकेच्या वकिलाची क्षमता तुम्हाला माहित नसते. त्यामुळे चांगल्या वकिलाकडूनही सल्ला घ्यावा, अशी सूचना कर आणि गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांनी केलीये.
दिलासादायक! राज्यात सीएनजी होणार स्वस्त, व्हॅट कपातीची अधिसूचना जारी