Gold Silver Rate Today News | आज सोने खरेदीचा मुहूर्त, भाव पुन्हा घसरले, चांदीची किंमत ही अवाक्यात
Gold Silver Rate Today News | महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच, सोने खरेदीसाठी आजचा मुहूर्त तुम्हाला साधता येईल, कारण सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीही आटोक्यात आहेत.
Gold Silver Rate Today | जागतिक बाजारात सोने-चांदी कमकूवत पडले. भारतीय बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. सोने-चांदीचे भाव घसरले. वायदे बाजारात MCX वर सोन्याचे भाव आज 0.4% घसरून ₹50,200 प्रति 10 ग्रॅम या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले, तर चांदी 52,395 रुपये प्रति किलो या वर्षभरातील नीचांकी पातळीवर खाली आली. जागतिक बाजारात डॉलर निर्देशांक मजबूत झाला आहे. त्यामुळे सोने सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. डॉलर निर्देशांक 0.29% वाढून 108.983 झाला आहे. अमेरिकन फेडरल बँक (American Federal Bank) पुन्हा व्याजदर वाढवणार असल्याने डॉलर (Dollar) मजबूत होत आहे. तर सोन्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today News) महिन्याच्या पहिल्याच दिवशी घसरण दिसून आली. 31 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,000 रुपये झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,270 रुपये होता. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,500 रुपये झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,730 रुपये इतका आहे. तर चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी चांदीचे दर अजूनही आटोक्यात आहेत. चांदीचा आजचा भाव एका किलोसाठी 51,600 रुपये इतका आहे.
सोन्याच्या किंमतीवर दबाव
अमेरिकन फेडरल बँक चलनवाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवणार आहे. तसे संकेत बँकेने दिले आहेत.अमेरिकन डॉलर आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर (Gold Price) दबाव वाढला आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक गेल्या दोन दशकांच्या उच्चांकावर पोहचला आहे. त्याचा परिणाम जागतिक सराफा बाजारावर दिसून येत आहे. महागाईला आळा घालण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका तजवीज करत आहे. चलनवाढ कमी करण्यासाठी व्याजदर वाढीचा प्रमुख अजेंडा राबवण्यात येत आहे.
राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,500 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,730 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,530 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,760 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,530 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,760 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,530 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,760 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 516 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं. सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.