नवी दिल्ली | 17 जुलै 2023 : जुलै महिना आयकर रिटर्न भरण्याचा असतो. पगारदार व्यक्ती असो की व्यावसायिक असो त्याच्याकडून आयटी रिटर्न भरण्याची लगबग सुरु असते. आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असते. आता त्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. यामुळे अनेक जण सीए, कर सल्लागारांकडे धाव घेत आहे. काहींना सरकार मुदतवाढ देईल, अशी अपेक्षा आहे. यावर प्रथमच सरकारकडून महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
यंदा आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. यामुळे करदात्यांनी ३१ जुलैच्या आत आपला आयकर परतावा दाखल करावा, असे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. करदात्यांनी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. तसेच मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा करु नये. लवकरात लवकर आपला रिटर्न दाखल करावा. यंदा मागील वर्षापेक्षा जास्त रिटर्न दाखल होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मागील वर्षी 5.83 रिटर्न दाखल झाले होते. आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुटसूटीत आणि सोपी केली गेली आहे.
यंदा आयकर रिटर्न दाखल करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. यामध्ये 10.5 टक्के वाढ होण्याची अपेक्षा सरकारला आहे. जीएसटी दाखल करणाऱ्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 12 टक्के वाढ झाली आहे. यंदा 33.61 लाख कोटी कर जमा होईल, अशी शक्यता आहे.
आतापर्यंत 2.7 कोटी आयटीआर दाखल झाले आहेत. 16 जुलैपर्यंत 2 कोटी 73 लाख 12 हजार 434 जणांनी आपले रिटर्न दाखल केले आहे. तसेच आयकर विभागाकडून 1 कोटी 20 लाख 83 हजार 76 रिटर्नची पडताळणी करण्यात आली आहे. 1 कोटी 20 लाख रिर्टन पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत.
आयकर रिटर्न दाखल करण्याचे अनेक फायदे असल्याचे महसूल सचिव मल्होत्रा यांनी सांगितले. शेवटच्या तारखेची वाट पाहिल्यास धावपळ करावी लागते. परंतु मुदतीत रिटर्न दाखल झाल्यास परतावा मिळण्याची प्रक्रिया लवकर सुरु होते.