Health insurance : योग्य विम्याची निवड कशी कराल?, जाणून घ्या पॉलिसी खरेदी करताना काय काळजी घ्यावी
अनेकदा विमा घेताना विमा सल्लागाराकडून मोठमोठे दावे केले जातात. मात्र जेव्हा आपण प्रत्यक्षात ती पॉलिसी खरेदी करतो, तेव्हा आपल्याला असे आढळून येते की ती पॉलिसी आपल्या काहीच उपयोगाची नाहीये. त्यामुळे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
2020-21 मध्ये विकल्या गेलेल्या दर 1000 पॉलिसींमागे 36 पॉलिसी या बिनगरजेच्या असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती विमा नियामक ‘आयआरडीए’च्या (IRDA) वार्षिक अहवालात देण्यात आलीये. मिस-सेलिंग (Miss-selling) म्हणजे पॉलिसीधारकाला चुकीचं विमा उत्पादन विकलं गेलंय. इन्शुरन्स (Insurance) कंपनीच्या विक्री प्रतिनिधीनं दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात मिळत असलेल्या सुविधेत तफावत असल्यास गरज नसलेली पॉलिसी आपल्या पदरी पडते, असा अनुभव अनेकांना येतो. ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी काही बाबींचा विचार करण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये सर्व प्रथम कुटुंबाला किती क्लेम मिळणार?, तुम्ही मासिक प्रीमियम भरू शकता का?, तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळणार आहे का?, किती काळासाठी हप्ता भरावा? अशा काही महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करणे आवश्यक असते त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
कुटुंबाला किती क्लेम मिळतो?
पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल यावर लक्ष केंद्रित करू नका. केवळ हप्ता कमी आहे म्हणून चुकीचे उत्पादन खरेदी करू नका. तुम्हाला काही झाले तर तुमच्या कुटुंबाला किती सुविधा मिळेल यावर लक्ष केंद्रित करा. विमा पॉलिसी विकणारा एजंट असो किंवा ऑनलाइन एग्रीगेटर असो प्रत्येक जण स्वस्त प्रीमियमची जाहिरात करणारा असतो आणि या जाहिरातीला भुरळून विमाधारकाची फसवणूक होते. त्यामुळे विमा खरेदी करताना हप्त्याऐवजी किती कव्हर मिळतं आहे याकडे लक्ष द्या.
तुम्ही मासिक प्रीमियम भरू शकता का?
तुम्ही मासिक प्रीमियम भरू शकता का? असा प्रश्न जेव्हा तुम्हाला एखादी विमा कंपनी विचारते किंवा तिने नियुक्त केलेला एजंट विचारतो तेव्हा तुम्ही लगेच हो म्हणता. मात्र जरा थांबा, तुम्ही मासिक प्रीमियम भरल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जीवन विम्याचा हप्ता हा वार्षिक भरावा मासिक प्रीमियम हा तोट्याचा व्यवहार आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळेल का?
मुदत विमा योजनेत कोणताही परतावा मिळत नाही, तसेच बोनसही मिळत नाही. 10 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यास तुम्हाला 15 व्या वर्षापासून बोनस आणि हमी परतावा मिळणार असं सांगितलं गेलं असेल, तर तुम्हाला एंडोमेंट योजना विकली जात आहे हे आधी लक्षात घ्या. तुम्हाला अशावेळी परताव्याची हमी देताना मोठ्या रकमेचे आमिष दाखवण्यात येते. परंतु इंडोमेंट योजनेत चार ते पाच टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळत नाही. शिवाय हप्ताही जास्त असतो. केवळ परताव्याच्या लालसेपोटी एंडोमेंट विमा योजनेत तुम्ही मोठा हफ्ता भरत राहाता.
किती काळासाठी हप्ता भरावा ?
विम्याचा पहिला हप्ता खूप महत्त्वाचा असतो पण तुमच्यासाठी नाही तर एजंट किंवा विमा कंपनीसाठी. पहिल्या हप्त्यातील मोठा भाग एजंट ब्रोकर किंवा विमा एग्रीगेटरकडे कमिशन म्हणून जातो. तसेच पॉलिसीच्या नुतनीकरणाच्या वेळी काही भाग पुन्हा एकदा कमिशनच्या स्वरुपात ब्रोकरला मिळतो. एक रकमी हप्त्याच्या नावानं दीर्घकालावधीची विमा पॉलिसी विकली जाते. मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स कधीही एक रक्कमी नसतो. दर वर्षी तुम्हाला हप्ता भरावा लागतो हे कायम लक्षात ठेवा.
पहिले तीन वर्ष महत्त्वाचे
विमा कंपन्या 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या पॉलिसीचे क्लेम नाकारू शकतात. विमा कायद्याच्या कलम 45 अंतर्गत हे सर्व नमूद करता येते. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अशा कोणत्याही पॉलिसीमध्ये केलेला क्लेम विमा कंपनी नाकारू शकते, याला रिप्युडिएशन म्हणतात. मात्र हेच जर पॉलिसीधारक तीन वर्षांपासून प्रीमियम भरत असल्यास कंपन्या दावा नाकारू शकत नाहीत. त्यामुळे विमा खरेदी करण्यापूर्वी संबंधित पॉलिसीची संपूर्ण माहिती घेणे गरजेचं आहे. नियम आणि अटी न वाचता विमा खरेदी केल्यास चुकीचा विमा माथी मारला जाण्याची शक्यता असते. त्यामुळेच विमा पॉलिसी संदर्भातील नियम आणि वैशिष्टे समजल्यानंतरच पॉलिसी खरेदी कसा असा सल्ला दिला जातो.