तुम्ही देखील परदेशातून सोने खरेदी करताय का? तर या गोष्टींची काळजी नक्की घ्या!
परदेशातून किती तोळे सोने खरेदी करू शकतो? परदेशातून परत येताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते?

अलीकडेच कन्नड आणि तमिळ चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला दुबईहून बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह अटक करण्यात आली. या घटनेमुळे परदेशातून सोने आणण्याशी संबंधित नियम आणि कायद्यांची चर्चा तीव्र झाली आहे. लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, जसे की, परदेशातून सोनं आणताना काय काय नियम पाळले पाहिजेत आणि नियमांचं उल्लंघन केल्यास काय कायदेशीर कारवाई होईल? चला, जाणून घेऊया यासंबंधीचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया.
परदेशातून किती सोने आणता येईल?
भारत सरकारच्या नियमांनुसार, पुरुष प्रवासी २० ग्रॅम आणि महिला प्रवासी ४० ग्रॅम सोने शुल्कमुक्त आणू शकतात. याशिवाय, १५ वर्षांखालील मुलांना ४० ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे, मात्र त्यासाठी नाते सिद्ध करणे आवश्यक आहे. भारतीय पासपोर्ट कायदा १९३७ नुसार, भारतीय नागरिक विविध प्रकारच्या सोन्याची आयात (दागिने, बिस्किटे आणि नाणी) विहित प्रमाणात करू शकतात.
जास्त सोने आणण्यासाठी शुल्क
तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने आणल्यास, दागिन्यांवर ६% शुल्क (पूर्वी १५% होते, जे २०२४ च्या बजेटमध्ये कमी करण्यात आले) आकारले जाते. तसेच, बिस्किटे आणि नाण्यांवर १२.५% कस्टम ड्युटी आणि १.२५% समाजकल्याण अधिभार आकारला जातो.
देशातील सर्वाधिक तस्करीचे सोने कोठून येते?
सर्वाधिक तस्करीचे सोने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून येते. याशिवाय, म्यानमार आणि आफ्रिकन देशांमधूनही तस्करी होणारे सोने भारतात येते. सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तस्करीच्या सोन्यापैकी केवळ १०% सोन्याचा शोध लागला आहे. केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे राज्य सोने तस्करीसाठी सर्वात आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये सोन्याच्या तस्करीचे ६०% गुन्हे नोंदवले जात आहेत.
परदेशातून किती रोख रक्कम आणू शकतो?
परदेशातून रोख रक्कम आणण्याची मर्यादा नाही, पण काही अटी आहेत. जर पुरुष प्रवासी ५००० डॉलर (४.३ लाख रुपये) किंवा अधिक रक्कम आणि महिला प्रवासी १०,००० डॉलर (८.६ लाख रुपये) पेक्षा अधिक रोख रक्कम आणतात, तर त्यांना ती रक्कम कस्टम विभागाकडे घोषित करणे आवश्यक आहे. भारतीय चलनाची मर्यादा २५,००० रुपये आहे.
रोख रक्कम कशी घोषित करावी?
रोख रक्कम घोषित करण्यासाठी तुम्ही विमानतळावर कस्टम डिक्लेरेशन फॉर्म (CDF) भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला रोखीच्या स्त्रोताशी संबंधित कागदपत्रे देखील दाखवावी लागतील. जर सर्व माहिती योग्य असली आणि कर भरल्यानंतर, तुमचं रोख रक्कम क्लिअर होईल.
नियमांचे उल्लंघन केल्यास काय कायदेशीर कारवाई होईल?
जर प्रवाशांनी कस्टम नियमांचे उल्लंघन केलं, उदाहरणार्थ, सोने किंवा रोख रक्कम लपवून ठेवली किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम आणली, तर माल जप्त केला जाऊ शकतो. अशा प्रवाशांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि मोठा दंड भरावा लागू शकतो.
सीमाशुल्क कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत, तुम्हाला सहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच, फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) अंतर्गत एक वर्षाची कारावासाची सजा आणि दंड देखील होऊ शकतो. या कायद्यांनुसार, तुमचं सोने किंवा रोख रक्कम जप्त केली जाऊ शकते.
परदेशातून सोनं किंवा रोख रक्कम आणताना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि मोठे दंड देखील भरावे लागू शकतात. त्यामुळे प्रवाशांना या नियमांची पूर्ण माहिती घेणं आणि त्यानुसारच प्रवास करणं महत्त्वाचं आहे.