मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रीय डिजिटल स्वास्थ्य मिशनचा (एनडीएचएम) प्रारंभ झाला. गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना राबवण्यात आली. आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB PM-JAY) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनला राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला आहे.
राष्ट्रीय हेल्थ डिजिटल मिशन (NHDM) अंतर्गत, प्रत्येक नागरिकासाठी एक आरोग्य ओळखपत्र तयार केले जाईल. जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल. ज्यामध्ये वैयक्तिक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल अॅप्लिकेशनच्या मदतीने पाहिल्या जाऊ शकतात.
NDHM हेल्थ रेकॉर्ड (PHR Application) गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यांना हेल्थ आयडी मिळवायचा आहे त्यांना याद्वारेच नोंदणी करावी लागेल. याद्वारे, प्रत्येक वापरकर्त्यासाठी एक अद्वितीय आयडी तयार केला जाईल.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल असे लोक सरकारी-खाजगी रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वेलनेस सेंटर आणि कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन त्यांची आरोग्य ओळख नोंदणी करू शकतात. मोबाईल नसलेले लोक त्यांचे आरोग्य ओळखपत्र या केंद्रांवर बनवू शकतात. लाभार्थ्याला नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी सारखी सामान्य माहिती विचारली जाईल आणि हेल्थ आयडीची नोंदणी केली जाईल.
हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग, घराचा पत्ता इत्यादी तपशील भरावे लागतील. तुम्ही आधार, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यांच्या साहाय्याने युनिक हेल्थ आयडी निर्माण करु शकता.
हेल्थ आयडीसाठी आधारकार्ड सक्तीचे नाही. तुम्ही स्वत: मोबाईल नंबर आणि वैयक्तिक तपशील देऊनही हेल्थ आयडी निर्माण करु शकता. तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डाशी लिंक नसेल तर तुम्ही नजीकच्या रुग्णालयात किंवा संबंधित संस्थेत जाऊन हेल्थ आयडीसाठी नोंदणी करु शकता. हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला सध्या आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाची गरज आहे. मात्र, आगामी काळात पॅनकार्ड, वाहनचालक परवाना आणि अन्य कागदपत्रांचा वापर करुनही हेल्थ आयडी तयार करता येईल.
तुमचा हेल्थ आयडी हा युनिक असेल. त्यामुळे तुम्ही आरोग्याशी संबंधित सर्व तपशील या हेल्थ आयडीशी जोडू शकता. हेल्थ आयडीच्या नोंदणी प्रक्रियेसाठी फक्त 10 मिनिटांचा अवधी लागतो. वैयक्तिक तपशील भरल्यानंतर मोबाईल क्रमांक किंवा आधारकार्डाच्या माध्यमातून तुमची पडताळली केली जाईल.
संबंधित बातम्या:
आधारकार्डाप्रमाणे तयार होणार तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड, कशाप्रकारे करणार काम, जाणून घ्या सर्वकाही