Aadhar-Pan Link : 30 जूनपर्यंत आधारशी पॅनकार्ड लिंक केले नाही तर जादा दंड द्यावा लागेल, अर्थमंत्र्यांची घोषणा
ज्या लोकांनी आधारशी पॅन लिंक केले नाही, त्यांनी तातडीने हे काम करायला हवे. अन्यथा दंडाच्या रकमेत आणखी वाढ होईल असे म्हटले जात आहे.
नवी दिल्ली : नागरीक आधारकार्डशी आपल्या पॅनकार्डला लिंक करण्याकरीता होत असलेल्या दिरंगाईबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आधारशी पॅनकार्ड न जोडणाऱ्या नागरिकांना होत असलेल्या दंडाची देखील पाठराखण केली आहे. आधारकार्डशी पॅनकार्ड लिकींग करणे 31 मार्च 2022 पर्यंत मोफत होते. 1 एप्रिल 2022 पासून त्यासाठी 500 रूपयांचा दंड लागू करण्यात आला. त्यास जुलै महिन्यानंतर वाढवून हजार रूपये करण्यात आले आहे. आता 30 जून 2023 पर्यंत आधार-पॅन लिंक केले नाही तर ते निष्क्रीय होणार आहे.
सध्याच्या निर्णयानूसार जर 30 जून 2023 पर्यंत आधारशी पॅनकार्ड लिंक केले नाही तर ते निष्क्रीय होणार आहे. गुरूवारी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की आधारशी पॅनकार्ड लिंक करण्यासाठी आधीच खूप वेळ दिला गेलेला आहे. आतापर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवे होते. ज्या लोकांनी असे केले नाही, त्यांनी तातडीने हे काम करायला हवे. जर दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण न केल्यास दंडाच्या रकमेत आणखी वाढ होईल.
टीडीएस आणि टीसीएसपासून वाचण्यासाठी
वित्त मंत्रालयाने गेल्या 28 मार्च रोजी जाहीर केलेल्या वक्तव्यात म्हटले होते की टीडीएस आणि टीसीएसच्या अडचणीतून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोणत्याही परिस्थिती आपले आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करायलाच हवे. जर नागरिकांनी असे केले नाही तर त्यांचे पॅनकार्ड निष्क्रीय होऊन जाईल. आणि त्यांना टीडीएस आणि टीसीएस क्लेम मिळविण्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
तर 1 जुलैपासून पॅनकार्ड निष्क्रीय
इन्कम टॅक्स एक्ट 1961 नूसार ज्या लोकांच्या नावे 1 जुलै 2017 पर्यंत पॅनकार्ड जारी झाले आहेत आणि जे आधारकार्डसाठी पात्र आहेत त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्या आधारकार्डशी आपले पॅनकार्ड लिंक करायलाच पाहीजे. सध्या आधारशी पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे अशात ज्या लोकांनी हे काम केलेले नाही त्यांचे पॅनकार्ड 1 जुलै 2023 पासून निष्क्रीय होईल असे सरकारने म्हटले आहे.