वाढीव व्याज दराच्या अपेक्षेने बँकेचे बचत खाते बदलत आहात?, तर या टिप्स फॉलो करा
सध्या बँकांमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. यातूनच अनेक बँका ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बचत खात्यावर वाढीव व्याजदर देतात. मात्र बचत खात्यासाठी बँकेची निवड करताना जोखमीचा देखील विचार करावा लागतो.
निवृत्त लष्करी जवान सुरेश यांच्या पत्नीची तब्येत चांगली राहत नसल्यानं त्यांनी आपत्कालीन निधी (Emergency funds) म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या बचत खात्यात (Savings account) दोन लाख रुपये ठेवलेत. या ठेवीवर त्यांना वार्षिक 2.7 टक्के दराने व्याज (Interest) मिळते. इतर बँका बचत खात्यावर जास्त व्याज देत असल्याचे सुरेश यांना समजले आणि त्यावर काय करावे हा विचार ते करू लागले. 25 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात, देशातील सर्व बँकांमधील एकूण ठेवी 162.2 लाख कोटी रुपये इतक्या आहेत . आरबीआयच्या आकडेवारीनुसार, बँकांचा कासा 43.7 टक्के होता. कासा म्हणजे बँकांच्या बचत आणि चालू खात्यांमध्ये जमा असलेली रोकड होय. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बचत खात्यांवर व्याजदर निश्चित करण्याचे अधिकार बँकांना आहेत. काही बँका ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी बचत खात्यांवर जास्त व्याज देतात. सध्या देशातील सर्वात मोठी बँक SBI बचत खात्यावर 2.70 टक्के व्याज देते. तर खासगी क्षेत्रातील बँक आयडीएफसी 5 टक्के व्याज देते. येस बँक 5.25 टक्के आणि डीसीबी बँकेत 6.50 टक्के व्याज मिळते. खासगी बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा दुप्पट व्याजदर देतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या बचत खात्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्यास अधिक कमाईसाठी तुम्ही ती खासगी बँकांमध्ये जमा करू शकता. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे विचारात घेतले पाहिजेत.
निर्णय घेण्याची घाई करू नका
कोणत्या बँकेत पैसे जमा करावेत, या मुद्द्यावर घाईघाईने निर्णय घेऊ नये असं आर्थिक सल्लागारांचं मत आहे. काही बँका तुमच्या बचत खात्यात असलेल्या रकमेवर आधारित व्याजदर निश्चित करतात. साधारणपणे बचत खात्यांमध्ये लोकं जास्त पैसे ठेवत नाहीत. तुमच्या बचत खात्यात मोठ्या प्रमाणात रोकड राहत असल्यास तुम्ही बँक बदलण्याचा विचार करावा, असे देखील तज्ज्ञ सांगतात. बचत खात्यात मोठ्या प्रमाणात रोख असल्यास अधिक कमाईसाठी इतर पर्याय तपासा तुमच्या ठेवींवर जास्त कमाई करण्यात काही नुकसान नाही. तुम्ही इमर्जन्सी फंड म्हणून पैसे जमा केले असतील, तर ते अशा बँकेत जमा केले पाहिजे जिथून तुम्ही कधीही काढू शकता. तसेच गुंतवणुकीत कोणतीही जोखीम असू नये. काही सहकारी आणि खासगी बँका जास्त व्याज देतात पण तिथं जोखीम देखील अधिक असते, असं कर आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन म्हणतात. पीएमसी बँकेचे प्रकरण लक्षात आहे ना? बँकांमध्ये जमा केलेल्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा विमा उतरवला जातो. पण बँक दिवाळखोरीत निघाल्यास ही रक्कम मिळवण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होते. शिवाय, या सर्व गोष्टींमुळे खातेदाराला व्याजसुद्धा मिळत नाही.
बँकेची आधी संपूर्ण माहिती घ्या
तुम्ही बँक बदलण्याचा विचार करत असल्यास, खाते उघडण्यापूर्वी व्याजदरासोबतच सेवा शुल्कांचीही माहिती घ्या. बँका सेवांवर अतिरिक्त शुल्क आकारून जास्त व्याजदराची वसुली करतात. या बँकांमध्ये जास्त व्यवहार शुल्क आणि किमान ठेव मर्यादा असू शकते. बचत खात्यातून वारंवार पैसे काढत असताल किंवा चेकबुक खूप वापरत असाल तर तुम्हाला या सर्व सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. बँक अचानक बदलल्यास कार, घर आणि वैयक्तिक कर्जाचा ईएमआय सुरू असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तेव्हा या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडण्यापूर्वी त्या बँकेची सर्व माहिती घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.