पीएनबी बँकेकडून घर आणि दुकानांची स्वस्तात लागणार बोली, विकत घ्यायचं असेल तर जाणून घ्या प्रोसेस

| Updated on: Jul 08, 2023 | 6:44 PM

पीएनबी बँकेकडून देशभरातील घरं आणि दुकानांचं ऑनलाइन लिलाव जाहीर केला आहे. कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बँकेकडून लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे.

पीएनबी बँकेकडून घर आणि दुकानांची स्वस्तात लागणार बोली, विकत घ्यायचं असेल तर जाणून घ्या प्रोसेस
पीएनबी बँकेकडून घर आणि दुकानांचा लिलाव, महागडी घरं स्वस्तात घेण्याची नामी संधी; कसं ते जाणून घ्या
Follow us on

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेकडून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी लिलाव जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत 11374 घरं आणि 2155 दुकानांचा लिलाव होणार आहे. ही घरं आणि दुकानं स्वस्तात खरेदी करण्याची नामी संधी आहे. कारण कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेने हा लिलाव जाहीर केला आहे. ई लिलावाच्या माध्यमातून तुम्ही घर किंवा दुकान खरेदी करू शकता. 20 जुलै 2023 रोजी घर आणि दुकानांचा लिलाव होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करून याबाबतची माहिती जाहीर केली आहे. ही प्रॉपर्टी एनपीए यादीत टाकलेली असते. म्हणजेच प्रॉपर्टीवर कर्ज घेऊन त्या व्यक्तीने त्या रक्कमेची परतफेड केलेली नसते. त्यामुळे बँक अशी प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेते आणि रक्कम वसुलीसाठी लिलाव करते.

कोणत्या प्रॉपर्टीचा होणार लिलाव

बँकेच्या या लिलावात अनेकदा मार्केटच्या तुलनेत स्वस्तात घरं आणि दुकानं मिळतात. पंजाब नॅशनल बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 11374 घरं, 2155 दुकानं, 1113 इंडस्ट्रियल, 98 अग्रीकल्चर,34 सरकारी आणि 11 बँक पार्टिसिपेटिंग प्रॉपर्टी यांचा लिलाव होणार आहे. सर्व प्रॉपर्टी डिफॉल्टर यादीतील आहेत. जर तुम्हाला या लिलावातून प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर https://ibapi.in/ वेबसाईटवर सर्वकाही माहिती दिलेली आहे. पुढच्या 30 दिवसात आणखी 1701 घरं, 365 दुकानं आणि 177 इंडस्ट्रियल प्रॉपर्टीचा लिलावही होणार आहे. या बाबतची माहितीही वेबसाईटवर देण्यात आली आहे.

लिलावात कसा भाग घ्याल

पंजाब नॅशनल बँकेकडून आयोजित केलेल्या ई लिलावत भाग घ्यायचा असेल तर https://ibapi.in/ या लिंकवर क्लिक करा. ही लिंक ओप झाली की त्या पेजवर ई ऑक्शन प्रॉपर्टी दिसेल. त्यानंतर नोटीसीत दिलेल्या मालमत्तेची रक्कम जमा करावी. त्यानंतर केवायसी कागदपत्रं संबधित शाखेत जमा करावी. ई लिलावात सहभागी होण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी महत्त्वाची आहे. सर्व काही झाल्यानंतर ईमेल आयडीवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्यानंतर लिलावात सहभागी होता येईल.