Income tax return : गिग वर्कर म्हणजे काय; गिग वर्करनी आयकर रिटर्न भरताना कोणती काळजी घ्यावी?
गिग वर्कर म्हणजे साधारणपणे असे व्यवसायिक ज्यांची कामे ही ऑडरप्रमाणे चालतात. यामध्ये लेखक, स्टँडअप कॉमेडियन, अभियंते यांचा समावेश असतो. या लोकांची कामे ही ऑडरप्रमाणे चालत असल्याने उत्पन्नाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आयकर रिटर्न भरताना काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मुंबईत राहणाऱ्या मोहितचा ‘फायर ब्रदर्स’ नावाचा स्वतःचा बँड आहे. लॉकडाऊन (Lockdown) संपल्यानंतर त्याला तीन-चार महिन्यांपासून चांगले काम मिळू लागले. आर्थिक वर्षाच्या शेवटी आयकर रिटर्न (Income tax return) भरायचा आहे. मोहितची ही आयकर रिटर्न भरण्याची पहिली वेळ असल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मोहितप्रमाणेच देशात सुमारे 1.5 कोटी लोक गिग वर्कर (Gig Worker) आहेत. गिग वर्कर म्हणजे जे बुकिंगप्रमाणे काम करतात. स्टँडअप कॉमेडियन, लेखक, सॉफ्टवेअर इंजिनियर यांचा गिग वर्करमध्ये समावेश होतो. कोविडनंतर गिग वर्कर वाढले. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने जारी केलेल्या अहवालानुसार, देशात अल्प ते मध्यम कालावधीसाठी गिग वर्करची संख्या सुमारे 2 कोटी 4 लाख एवढी होणार आहे. दीर्घ कालावधीसाठी गिग वर्करची संख्या अर्थव्यवस्थेत 9 कोटी एवढी असू शकते.
गिग वर्करसाठी आयकर कायदा कसा आहे ?
सुरुवातीला आयकर रिटर्नचा फॉर्म 4 म्हणजे, ITR 4 गिग वर्करसाठी उपयुक्त आहे. गिग वर्कर्सचे उत्पन्न देखील स्वयंरोजगाराप्रमाणे “व्यवसाय आणि व्यवसायातील उत्पन्न” श्रेणीमध्ये गणले जाते. हाच प्रकार व्यावसायिक लोकांसाठी देखील आहे. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील इत्यादी. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वार्षिक उत्पन्नाच्या 50 टक्के खर्च दाखवून करपात्र उत्पन्न कमी करता येते. उदाहरणार्थ, समजा एका गिग वर्करचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. एकूण उत्पन्नापैकी तो .5 लाख रुपये खर्च दाखवू शकतो. हे खर्च तुमच्या उपकरणांचा वापर, कार्यालयातील दुरुस्ती, भाडे, टेलिफोन किंवा मोबाइल बिल इत्यादींशी संबंधित असू शकतात. खर्च दर्शविल्यानंतर गिग वर्कर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूक किंवा खर्च करून 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लाभ देखील घेऊ शकतात. यानंतर उर्वरित उत्पन्नावर स्लॅबनुसार कर आकारला जातो . म्हणजेच 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असते त्यानंतर जास्तीत जास्त 30 टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो.
…तर आगाऊ कर वेळेवर जमा करा
सामान्यतः गिग वर्कर्सना मिळणाऱ्या पेमेंटमधून TDS कापला जातो. जर TDS कापला नसेल, तर आगाऊ कर वेळेवर जमा करण्याची काळजी घ्यावी. अन्यथा कलम 234B आणि 234C अंतर्गत दंडाची तरतूद आहे. ITR दाखल केल्यानंतर तुमच्या उत्पन्नावर कर लागत नसल्यास कपात केलेल्या TDS ची रक्कम परत मिळते. तुम्ही देखील मोहितप्रमाणे गिग वर्कर असल्यास वेळेवर आयकर रिटर्न भरा. आवश्यक असल्यास आगाऊ कर देखील भरल्यास अधिक चांगले.