EPFO : 6 कोटींहून अधिक सदस्यांना लवकरच खूशखबर! ईपीएफवरील व्याजदराबाबत आज फैसला
EPFO : चालू आर्थिक वर्षात ईपीएफवर आता किती व्याज मिळेल, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून महागाई वाढत असली तरी ईपीएफवरील व्याजदर वाढ न होता, घसरण होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता हा व्याजदर किती असेल?
नवी दिल्ली : ईपीएफओच्या सदस्यांना लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. अथवा त्यांना निराशही व्हावे लागू शकते. ईपीएफवर किती व्याज वाढणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून महागाई वाढत असली तरी ईपीएफवरील व्याजदर वाढ (Interest Rate Hike) न होता, घसरण होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) दोन दिवसीय बैठक सुरु आहे. सोमवारपासून ही बैठक सुरु झाली. आज व्याजदराविषयी निर्णय येण्याची शक्यता आहे. 2022-23 साठी ईपीएफवरील व्याज दरात वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा तोच व्याजदर असेल, त्यात वाढ होईल की कपातीचा पायंडा सुरु राहील, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष असेल.
गुंतवणुकीवर अधिक रिटर्न नाही
याप्रकरणी एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. त्यानुसार, 31मार्च 2022 पर्यंत कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून एकूण 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यांची गुंतवणूक सध्या चांगली कामगिरी करत आहे. पण या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळण्याची शक्यता कमी आहे.
विना UAN क्रमांक खात्यातून काढा रक्कम
विना UAN क्रमांक पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी तु्म्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये धाव घ्यावी लागेल. याठिकाणी तुम्हाला एक नॉन-कम्पोजिट फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्याआधारे तुमच्या पीएफ खात्यातून रक्कम काढता येईल. ऑनलाईन पीएफ खात्यातून रक्कम काढताना UAN क्रमांक देणे आवश्यक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांकही गरजेचा आहे. त्यानंतरच तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येईल. ऑनलाईन पीएफ काढतांना युएएन क्रमांक महत्वाचा असतो.
निवृत्तीनंतर कर्मचारी पीएफ खात्यातील जमा रक्कम केव्हाही काढू शकतात. याशिवाय नोकरी सोडल्यानंतर त्याला 2 महिन्यानंतर तो ईपीएफमधील सर्व रक्कम काढू शकतो. जर तुमची नोकरी सुटली आणि तुम्ही बेरोजगार असाल तरी तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येईल. नोकरीत असताना तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढायची असेल तर त्यासाठी निश्चित नियमांचे पालन करावे लागेल. या नियमानुसारच तुम्हाला पीएफ खात्यातून आंशिक रक्कम काढता येईल. अर्ज केल्यानंतर 3 ते 7 दिवसांमध्ये (Working Days) पीएफ खात्यातील रक्कम मिळते.
सात वर्षांत निच्चांकी व्याजदर
- सीबीटीने व्याजदर ठरवल्यानंतर तो अर्थमंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठवला जातो.मार्च 2020 मध्ये ईपीएफओने 2019-20 साठी प्रॉव्हिडंट फंड ठेवींवरील व्याज दर 8.5 टक्क्यांवर आणला. हा व्याजदर सात वर्षांच्या निचांकी पातळीवर होता.
- 2018-19 मध्ये ईपीएफओवर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते. ईपीएफओने 2016-17 आणि 2017-18 मध्ये 8.65 टक्के व्याजही दिले होते.
- 2015-16 मध्ये हा व्याजदर 8.8 टक्के होता. त्याचबरोबर 2013-14 मध्ये 8.75 टक्के व्याज आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते.
- मात्र, 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता. 2011-12 मध्ये हे प्रमाण 8.25 टक्के होते.
- आर्थिक वर्ष 2020-21 साठी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्क्यांनी व्याज जमा
- त्यानंतर व्याजदरात अजून कपात करत तो 8.1 टक्क्यांवर आला आहे.