Insurance Process : आता विम्याच्या दाव्यासाठी नाही लागणार वेळ, IRDAI ने शोधला जालीम उपाय
Insurance Claim : विमा दाव्याचा जलद निपटारा करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने हा रामबाण उपाय शोधला आहे. त्यासाठी काही बदल करण्यात आले आहे. त्याचा विमाधारकांना मोठा फायदा होईल.
नवी दिल्ली : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulator and Development Authority of India- IRDAI) विमाधारकांसाठी यंदा महत्वपूर्ण घोषणा केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला विमा पॉलिसीशी (Insurance Policy) निगडीत एक महत्वपूर्ण नियम लागू केला आहे. त्यानुसार, लोकांना आता नवीन विमा पॉलिसी घेताना केवायसी अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जीवन विमा, आरोग्य, ऑटो, घर आणि इतर सर्व प्रकारच्या विम्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमामुळे आता विमाधारकाला अनेक फायदे मिळणार आहेत. त्यांचा विमा दाव्याचा निपटारा आता अतिजलद होणार आहे. विमाधारकांना त्यांच्या विम्याची रक्कम, बोनस मिळण्यास या नियमामुळे उशीर होणार नाही. तसेच कंपनीवरील ताणही कमी होणार आहे.
यापूर्वी विमा पॉलिसी खरेदी करताना ग्राहकांना केवायसी करणे अनिवार्य नव्हते. विमा खरेदी करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असेल तरच केवायसी करण्यात येत होता. त्यासाठी कोणतेही बंधन नव्हते. केवायसी अपडेट न केल्यास ग्राहकाचे कोणतेही नुकसान होत नव्हते. यापूर्वी त्याला केवायसीचा आग्रह करण्यात येत नव्हता.
नवीन नियम आल्याने दाव्याची प्रक्रिया जलद गतीने होईल. दाव्याचा निपटारा पटकन करता येईल. या नियमामुळे विमा कंपनीलाही विमाधारकाची ओळख पटविणे सोपे होईल. केवायसीमुळे ग्राहकाशी संबंधित सर्व माहिती विमा कंपनीला मिळविणे सोपे होईल. केवायसीमुळे विमा कंपन्या विम्यासंबंधीच्या दाव्यातील त्रुटी लवकर दूर करु शकतील.
तज्ज्ञांच्या मते दावा निपटाऱ्याची प्रक्रिया या नियमामुळे गतीमान होईल. कारण आता विमा कंपनीकडे ग्राहकाची सर्व अद्ययावत माहिती असेल. केवायसी नियमामुळे बोगस क्लेमची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच योग्य व्यक्तीलाच दाव्याची रक्कम मिळले.
एका वृत्तातील दाव्यानुसार, IRDAI ने एक महत्वपूर्ण प्रस्ताव ठेवला आहे. ज्यांनी कोविड काळात लसीचे दोन डोस आणि बुस्टर डोस घेतला आहे. त्यांच्यासाठी विमा पॉलिसीवर सवलत देण्याचा विचार करण्याचा आग्रह धरला आहे. पीटीआयच्या दाव्यानुसार, कोविडसंबंधीत जीवन आणि इतर विमा पॉलिसींचा दावा पटकन निकाली काढण्यासही सांगण्यात आले आहे.
नियामक प्राधिकरणाने विमाधारकाला कोविड काळात उपचारासंबंधीचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्याचे सांगण्यात आले आहे. कोविड काळातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी एक वॉर रुम तयार करण्यास सांगण्यात आले आहे. जीवन विमा, आरोग्य, ऑटो, घर आणि इतर सर्व प्रकारच्या विम्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.