मुंबई : अर्थव्यवस्थेबाबत (Economy) जेव्हा अनिश्चिततेची स्थिती निर्माण होते, तेव्हा सोन्याच्या किमती (Gold latest price) वाढू लागतात. सोन्याचे दर वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती महागाई हे आहे. महागाई (Inflation) जेव्हा नियंत्रणाबाहेर वाढते तेव्हा देखील सोन्याच्या दरात तेजी येते. सध्या स्थितीमध्ये भारतात या दोन्ही गोष्टी पहायला मिळत आहेत. देशात सध्या महागाई सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. महागाई वाढत असल्याने जीडीपी घसरत आहे. अशा स्थितीमध्ये सोन्यात गुंतवणूक केल्यास ती अधिक फायदेशीर ठरू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, महागाई वाढत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय हा गुंतवणूकदारांपुढे असतो. तुम्ही मध्यम कालावधीसाठी सोन्यात गुंतवणुकीचा विचार करू शकता.
सध्या परिस्थितीमध्ये सोन्यात गुंतवणूक करावी का? याबाबत बोलताना अजय केडिया यांनी म्हटले आहे की, अमेरिकेची मे महिन्यातील महागाईची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. सध्या अमेरिकेत महागाई गेल्या 40 वर्षांतील उच्चस्थरावर पोहोचली आहे. महागाई वाढत असल्याने अमेरिकेवर व्याज दर वाढीचा दबाव आहे. चालू आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत व्याज दर 50 बेसिस पॉईंटने वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. रेपो रेट वाढल्यास सोन्या-चांदी सारख्या मौल्यवान धातुंच्या किमतीवर दबाव येतो. व त्या काहीकाळापर्यंत स्थिर राहातात. भारतात देखील गेल्या आठवड्यात रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. रेपो रेट वाढवल्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोन्याचे दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहेत. मात्र पुढील काळात त्यामध्ये वाढ होऊ शकते.
सध्याची परिस्थिती पहाता सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का? या प्रश्नाला उत्तर देताना केडिया यांनी म्हटले आहे की जेव्हा महागाई नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. इतिहासाचा अभ्यास केल्यास नियंत्रणाबाहेर गेलेली महागाई कंट्रोल करण्यासाठी कोणत्याही देशाला कमीत-कमी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो. तुम्ही जर या कालावधित सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर ती फायद्याची ठरू शकते. सध्या सोन्याचे दर प्रति तोळा 51 हजारांच्या आसपास आहेत. मात्र पुढील दोन, तीन महिन्यांत ते 53- 54 हजारांपर्यंत जाऊ शकतात. अशा स्थितीत सोन्यात केलेली अल्प कालावधीची गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.