पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे; सुरक्षेच्या हमीसह दर महिन्याला मिळेल कमाईची संधी
पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला गुंतवणुकीच्या सुरक्षेची हमी तर मिळतेच सोबतच या योजनेत चांगला परतावा देखील मिळतो.
जर भविष्यात तुमचा एखाद्या योजनेत गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या बचत योजना (Saving Schemes) या सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. या योजनांचे वैशिष्ट म्हणजे एक तर तुमचा पैसा सुरक्षीत राहातो व तुम्हाला गुंतवणुकीच्या मोबदल्यात चांगला परतावा देखील मिळतो. अशा अनेक योजना आहेत, ज्यात पोस्टाच्या बचत योजनांपेक्षा अधिक पैसा मिळतो, मात्र अशा योजनेत जोखीम देखील अधिक असते. तुम्हाला जर कोणतीही जोखमी न घेता चांगला परतावा मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. बँक आणि पोस्टाची तुलना करायची झाल्यास समजा तुम्ही एखाद्या बँकेत तुमचे खाते उघडले किंवा बँकेच्या एखाद्या योजनेत पैसे गुंतवले आणि उद्या बँकेचे दिवाळे (Bank Default) निघाले तर सरकारी नियमानुसार तुम्हाला केवळ पाच लाख रुपयांपर्यंतचीच रक्कम परत भेटते. मात्र पोस्टाच्या योजनेचे तसे नसते, तुम्हाला इथे तुमची संपूर्ण रक्कम ती तेखील व्याजासकट भेटते. आज आपन पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पोस्टाच्या या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट अर्थात आरडी (RD Account) असे आहे.
व्याज दर
पोस्ट ऑफीसच्या आरडी योजनेत सध्या तुम्हाला गुंतवणुकीवर 5.8 टक्के व्याज मिळत आहे. सध्याचा व्याजदर एक एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. या योजनेत दर तीन महिन्याला व्याज खात्यात जमा केले जाते.
गुतंवणुकीची रक्कम
पोस्ट ऑफीसच्या आरडी खात्यात तुम्ही कमीत कमी दर महिन्याला 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवणूक करावी याला काही मर्यादा नाही. तुम्ही दहा रुपयांच्या पटीत कितीही रक्कम खात्यात जमा करू शकता.
खाते कोणाला सुरू करता येते
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत कोणत्याही प्रौढ भारतीय नागरिकाला खाते उघडता येते. तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेंतर्गत ज्वॉइंट खाते देखील ओपन करू शकता. ज्यांनी आपल्या वयाची आठरा वर्ष पूर्ण केली नाहीत असे अल्पवयीन व्यक्ती हे आपल्या पालकांच्या संमतीने खाते ओपन करू शकतात. आरडी खात्याचा कालावधी हा साठ महिन्यांचा म्हणजेच पाच वर्षांचा असतो. पाच वर्षांनंतर तुमच्या हातात परतावा म्हणून एक चांगली रक्कम येऊ शकते. तुम्ही या खात्याचा कालावधी वाढू देखील शकता.