Pancard : तर पॅनकार्ड होईल बिनकामाचे, चुकूनही करु नका ही चूक
Pan Card : ही चूक केल्यास तुमचे पॅनकार्ड बाद होईल.
नवी दिल्ली : पॅनकार्ड (Pan Card) देशातील करदात्यांचे (Taxpayers) ओळखपत्रच आहे. आपली आर्थिक कुंडली पॅनकार्डच्या माध्यमातून समोर येते. पॅन कार्ड 10 अंकांचे अल्फान्यूमेरिक (Alphanumeric) संख्या आहे. तुमचा पॅनकार्ड क्रमांक अक्षर आणि संख्या मिळून तयार होतो. भारतात जो प्राप्तिकर (Income Tax) भरतो. त्याच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. पॅनकार्ड प्रणाली संगणकावर आधारीत असते. त्यामुळे करदात्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची करासंबंधीची माहिती पॅन क्रमांकावर नोंदवली जाते.
भारतात प्राप्तिकर विभागामार्फत पॅनकार्ड जारी करण्यात येते. नियमानुसार, देशातील एका व्यक्तीकडे एकच पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. पॅनकार्डमध्ये व्यक्तीचा पॅन क्रमांक, त्याचे नाव, जन्म तारीख, वडील वा पतीचे नाव, त्याचे छायाचित्र असते. जन्म तारखेसाठी पॅनकार्ड प्रमाण मानण्यात येते.
एकदा पॅनकार्ड काढल्यानंतर ते आयुष्यभरासाठी प्रमाण मानण्यात येते. पण एका चुकीमुळे तुमचे पॅनकार्ड बाद वा रद्द ही होऊ शकते. गेल्या एक वर्षापासून आयकर विभाग जनतेला पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला देत आहे. अनेकदा त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पण काही लोकांनी अजूनही ही बाब मनावर घेतली नाही.
इनकम टॅक्स विभागाने त्यासाठी वारंवार सूचना आणि अपडेट दिल्या आहेत. यापूर्वी निःशुल्क पॅन-आधार कार्ड लिकंची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली आहे. आता पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 निश्चित करण्यात आली आहे.
आयकर खात्याने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार आधार कार्ड-पॅनकार्ड यांची जोडणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आयकर कायदा, 1961 नुसार, सर्वच पॅनकार्ड धारकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 31 मार्च 2023 पूर्वीच आधारकार्ड-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 रोजीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
As per Income-tax Act, 1961, it is mandatory for all PAN holders, who do not fall under the exempt category, to link their PAN with Aadhaar before 31.3.2023. From 1.04.2023, the unlinked PAN shall become inoperative.
Urgent Notice. Don’t delay, link it today! pic.twitter.com/h7T6AAeDnc
— Income Tax India (@IncomeTaxIndia) January 17, 2023
पॅनकार्ड निष्क्रिय झालेले करदाते प्राप्तिकर रिटर्न जमा करु शकणार नाहीत. तसेच त्यांना थकबाकीचीही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. रिटर्नमध्ये त्रुटी असेल तर ती पूर्ण करता येणार नाही. तसेच कर कपातही जादा दराने होईल.
म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट अथवा बँकेतील खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. ते निष्क्रिय झाल्यास या सेवा मिळणार नाहीत. बंद झालेल्या पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येणार नाही. असा प्रयत्न केल्यास तुम्हाला दंड लागणार आहे. प्राप्तिकर अधिनियम 1961 चा नियम 272 B नुसार, तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.