महागाईच्या चटक्यांमुळे (Inflation)चोहोबाजूने होरपळून निघत असताना देशातील नागरिकांना महागाईचा पुन्हा एकदा जोर का झटका लागला आहे. स्वयंपाकाचा गॅस (LPG Cylinder Price) 50 रुपयाने महागल्याने ‘हाय हाय ये मंहगाई’ अशी म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली आहे. त्यातच आता सबसिडीही निघून गेल्याने सर्वांचेच खायचे वांदे झाले आहेत. सरकारी तेल वितरण कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (आयओसीएल) (IOCL)च्या आकडेवारीनुसार, मार्च 2014मध्ये सबसिडी मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरची किमत 410 रुपये होती. आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव 50 रुपयाने वाढले आहेत. गेल्या 8 वर्षात स्वयंपाकाच्या गॅसची किमत अडीच पट वाढली आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड संतापले आहेत.
आयओसीएलच्या आकडेवारीनुसार मार्च 2014मध्ये सबसिडी मिळणाऱ्या सिलिंडरची किमत 410 रुपये होती. आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव 50 रुपयाने वाढले आहेत. मुंबई आणि दिल्लीत आता स्वयंपाकाचा गॅस 1053 रुपयांना मिळणार आहे. 14.2 kg च्या गॅस सिलिंडरसह आता 5kg च्या छोट्या स्वयंपाकाच्या गॅसचेही दर वाढले आहेत. या छोट्या गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडरमागे 18 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. अशा प्रकारे पाहिल्यास 14.2 kg च्या गॅस सिलिंडरची किंमत गेल्या आठ वर्षात 157 टक्के वाढली आहे.
गेल्या वर्षभरात दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 219 रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी दिल्लीत 834.50 रुपयांना स्वयंपाकाचा गॅस मिळत होता. आता त्याची किमत वाढून 1053 रुपये झाली आहे. 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात यापूर्वी 19 मे रोजी वाढ झाली होती. तेव्हा गॅस सिलिंडरचे दर चार रुपयाने वाढले होते. त्यापूर्वी 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयाने वाढ करण्यात आली होती.
केवळ दिल्लीबाबत बोलायचं झालं तर 1 मार्च 2014 रोजी सबसिडी मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरची किमत 410.50 रुपये होती. त्यानंतर एक वर्षाने म्हणजे मार्च 2015 मध्ये त्याची किमत वाढून 610 रुपये करण्यात आली. पुढच्या एका वर्षात क्रूड ऑईलच्या किमती घसरल्याने फायदा झाला आणि मार्च 2016 मध्ये घरगुती सिलिंडरची किमत 513.50 रुपये झाली. म्हणजे भाव कमी झाले. पण लगेच मार्च 2017मध्ये गॅस सिलिंडरचे भाव वाढून 737.50 रुपये करण्यात आले. या वर्षी मार्चमध्ये पुन्हा भाव वाढ झाली आणि गॅस सिलिंडर 899 रुपयांना मिळू लागला. आता पुन्हा 50 रुपयाने वाढ झाल्याने घरगुती गॅसची किमत 1053 रुपये झाली आहे.
मोदी सरकारने आपल्या पहिल्या टर्ममध्ये मार्च 2015 पासून घरगुती गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या अकाऊंटवर पाठवण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी देशातील नागरिकांना 12 सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. कोरोनाच्या संकटानंतर गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी कमी करण्यता आली. त्यानंतर सरकारने लोकांना स्वेच्छेने सबसिडी सोडण्याची मोहीम हाती घेतली. परंतु, कोरोनाचं संकट अधिकच वाढल्याने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सरकारने सबसिडीच बंद करून टाकली. आता केवळ उज्ज्वला योजने अंतर्गत कनेक्शन घेणाऱ्यांनाच एलपीजी सिलेंडरवर सबसिडी दिली जाते.