Mudra Loan | मुद्रा लोन योजनेला उदंड प्रतिसाद, कर्ज वाटपाचा आकडा पाहून म्हणाल, मी केव्हा घेऊ कर्ज..
Mudra Loan | या आर्थिक वर्षात मुद्रा लोनसाठी तरुण व्यावसायिकांच्या उड्या अक्षरशः उड्या पडल्या आहेत. सरकारने वितरीत केलेली कर्जाची रक्कम पाहुन तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल.
Mudra Loan | प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (PM Mudra Loan-PMMY) तरुण व्यावसायिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या आर्थिक वर्षात स्वतःचा व्यवसाय (Business) सुरु करण्याचे अनेकांचे स्वप्न या योजनेमुळे साकार झाले आहे. तर काहींच्या स्वप्नांना मुद्रा कर्ज योजनेतील निधीने उभारी दिली आहे. कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची (capital) आवश्यकता असते. मोठी गुंतवणूक करायची म्हणजे भांडवल उभे करणे आलेच. त्यासाठी प्रत्येकाकडे हा पर्याय असेलच असे नाही. ही अडचण लक्षात घेत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) आर्थिक मदत करत आहे. मुद्रा कर्ज योजनेला त्यामुळेच तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 50 हजार ते 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना कुठलेही तारण द्यावे लागत नाही. प्रक्रिया शुल्कही अर्जदाराकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात मुद्रा कर्ज योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
1 लाख कोटींचे कर्ज वाटप
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्ज वितरण जास्त झाले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत छोट्या व्यावसायिक कर्जाच्या वितरणात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. कर्ज वाटपाने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या 26 ऑगस्टपर्यंत, 1,08,632 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत वितरणाची रक्कम गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वितरणाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये सप्टेंबरच्या शेवटी मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सुमारे 98 हजार कोटी कर्ज वाटप करण्यात आले होते.
कर्ज वाटप दुप्पट
मुद्रा योजनेतंर्गत कर्ज वाटपाचे आकडे अर्थव्यवस्थेतील सुधारणा दर्शवतात. या आर्थिक वर्षात 30 जूनपर्यंतच्या पहिल्या तिमाहीत सर्व बँका, एजन्सींनी मिळून 62,650 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत कर्ज वितरणाचे प्रमाण अवघे 37,600 कोटी रुपये इतके होते.
सार्वजनिक बँकांची मोठी भूमिका
सार्वजनिक क्षेत्रातील बँका लघु व्यावसायिक कर्जांचे प्रमुख माध्यम आहेत. मुद्रा लोनमध्येही त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. एकूण कर्ज वितरणात त्यांचा वाटा 55 टक्क्यांहून अधिक आहे. तर खासगी व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, एमएफआयएस आणि एनबीएफसीएस यांचा उर्वरित हिस्सा आहे. मुद्रा कर्ज योजनेसाठी सरकारी बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकाकजे अर्ज करता येतो. RBI ने सार्वजनिक क्षेत्रातील 27 बँका, 17 खाजगी बँका, 31 ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 सूक्ष्म वित्तीय संस्था आणि 25 NBFC यांना मुद्रा कर्ज वाटप करण्यासाठी अधिकृत केले आहे.
कर्ज कसे मिळवायचे?
बँका, वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी चौकशी करु शकता. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता. येथून अर्ज डाउनलोड करता येईल. त्यानंतर सर्व तपशील भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पुढील सोपास्कार आणि प्रक्रिया संबंधित बँकेतील शाखा व्यवस्थापक करतो.