Elon Musk : मस्क यांचा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद; कर्मचाऱ्यांमध्ये जॉब जाण्याची भीती, मस्क नेमकं काय म्हणाले?
एलन मस्क यांनी नुकताच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. या संवादादरम्यान मस्क यांनी कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली.
टेस्लाचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांनी पहिल्यांदाच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. एप्रिल महिन्यात मस्क यांनी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मस्क यांनी प्रथमच ट्विटरच्या (Twitter) कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी बोलताना मस्क यांनी म्हटले की, सध्या कंपनीच्या आर्थिक स्थितीला अधिक मजबूत करण्याची गरज आहे. सोबतच त्यांनी यावेळी कर्मचारी कपातीचे देखील संकेत दिले आहेत. त्यामुळे आता नोकरी (Job) जाण्याच्या भीतीने कर्माचाऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या तरी ट्विटर खरेदीची डील होल्डवर आहे. जर ही डील पूर्ण झाली तर शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार एनल मस्क यांनी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. या चर्चेदरम्यान मस्क यांनी कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली आहेत.
कर्मचारी कपातीचे संकेत
एलन मस्क यांनी प्रथमच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांनी त्यांना कर्मचारी कपातीबाबत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना मस्क यांनी म्हटले की, सध्या कंपनीचे जेवढे उत्पन्न आहे. त्यापेक्षा अधिक खर्च होत आहे. अशा स्थितीमध्ये खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. मात्र कर्मचारी कपात होणारच असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले नाही. कर्मचारी कपात होणार की नाही, हे त्यावेळी परिस्थिती कशी आहे ते पाहूनच निर्णय घ्यावा लागेल असे मस्क यांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कंपनीला अधिक मजबूत बनवणे हेच उद्दिष्ट असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. तसेच कंपनीला एका टॉप लेव्हलवर पोहोचवण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावे लागतील ते आपण घेऊ असे देखील मस्क यांनी म्हटले आहे.
फ्री स्पीचचे समर्थन
कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या या चर्चेमध्ये एलन मस्क यांनी फ्री स्पीच अधिकाराचे देखील जोरदार समर्थन केले. फ्री स्पीचचा अधिकार सर्वांना मिळायलाच पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर संबंधित व्यक्ती ट्विटरवर प्रश्न विचारू शकतो. त्याला आपले प्रश्न उपस्थित करण्याची पूर्ण संधी देण्यात येईल असे देखील यावेळी मस्क यांनी म्हटले आहे. मात्र तुमचा प्रश्न हा सरकारचा अपमान करणारा नसावा असे मस्क यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना मस्क यांनी वर्क फॉर्मवर देखील भाष्य केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे कंपनीमधील प्रदर्श अव्वल दर्जाचे असेल त्यांनाच वर्क फॉर्म होम देण्यात येईल असे मस्क यांनी म्हटले आहे.