Inflation! काय सांगता आता ब्रेडही महागले, पाच रुपयांची दरवाढ; गेल्या पाच महिन्यांत दोनदा भाव वाढवले
ब्रेडच्या भावात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे. ब्रेड दोन ते पाच रुपयांनी महाग झाले आहेत.
मुंबई : देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे, अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून (Edible oil) ते पेट्रोल, डिझेलच्या दरापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. महागाईचा आता आणखी एक धक्का लागला आहे. पुन्हा एकदा ब्रेडच्या दरात (Bread rates) वाढ करण्यात आली आहे. मॉर्डन, ब्रिटानिया आणि विब्स या तीन प्रमुख ब्रँड्सनी ब्रेडचे दर वाढवले आहेत. दोन ते पाच रुपयांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेडचे दर वाढवण्यात आले आहेत. यंदा ब्रेडच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात ब्रेडचे दर तीन ते पाच रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आता ब्रेडचे दर वाढवण्यात आले आहेत. 400 ग्रॅम पांढऱ्या ब्रेडची किंमत आता 33 रुपयांहून वाढून 35 रुपयांवर पोहोचली आहे. तर ब्राऊन ब्रेडची किंमत 45 रुपयांवरून 50 रुपयांवर पोहोचली आहे.
ब्रेडचे दर का वाढले?
ब्रेडच्या दरवाढीमागे मुख्य कारण म्हणजे ब्रेड तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालात झालेली वाढ हे आहे. ब्रेड तयार करण्यासाठी गहू, साखर आणि इतर काही वस्तुंची गरज असते. चालू वर्षात गव्हाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. गव्हाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. मात्र तरी देखील गव्हाचे भाव कमी झालेले नाहीत. साखरेचे भाव देखील वाढले आहेत. तसेच महागाई वाढत असल्यामुळे कामगारांच्या मजुरीचा खर्च देखील वाढला आहे. खर्च वाढत असल्यामुळे उत्पादनातून मिळणाऱ्या मार्जीनमध्ये घट झाल्याने विविध ब्रेड निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ब्रेडच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ब्रेड कंपन्यांनीच नाही तर ब्रेड तयार करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी देखील ब्रेडच्या दरात वाढ केली आहे. ब्रेड महाग झाल्याने आता त्याची आर्थिक झळ ही ग्राहकांना बसणार आहे.
व्यवसायिक काय म्हणतात?
ब्रेडच्या दरात वाढ करण्यात आली आहे, यावर प्रतिक्रिया देताना व्यवसायिकांनी म्हटले आहे की, सध्या गव्हाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोबतच साखर देखील महागली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. भट्टीसाठी लागणारे इंधन देखील महाग झाले आहे. मजुरीचा खर्च वाढला आहे. वाढत्या महागाईला तोंड देताना हातात काहीच उरत नसल्याने ब्रेडच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही केलेली दरवाढ ही कंपन्यांपेक्षा कमीच आहे. कंपन्यांनी जर ब्रेडच्या दरात दोन ते पाच रुपयांची वाढ केली तर आम्ही दर एक ते चार रुपयांनीच वाढवतो.