आता तुमच्या गावातील विकास कामांवर ठेवा नजर, तेही एका क्लिकवर; पुणे जिल्हा परिषदेकडून अॅपची निर्मिती
तुम्ही जो सरकारकडे कर जमा करतात त्या कराच्या माध्यमातून तुमच्या शहारात, गावात विविध विकास कामे राबवण्यात येतात. या विकास कामांवर आता अवघ्या एका क्लिकवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. यामुळे कामात पार्दशकपणा येण्यास मदत होईल.
पुणे : अनेकदा सार्वजनिक कामांमध्ये (Development works) भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा किंवा कामाला विलंब झाल्याच्या घटना घडत असतात. तुम्ही जो सरकारकडे (Government) कर जमा करतात त्या कराच्या माध्यमातून तुमच्या शहारात, गावात विविध विकास कामे राबवण्यात येतात. मात्र ही विकास कामे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होतीलच याची काही हमी नसते. मात्र आता सार्वजनिक कामांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांना बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागणे शक्य होणार आहे. तुम्ही तुमच्या गावात सुरू असलेल्या कामांवर अवघ्या एका क्लिकच्या माध्यमातून लक्ष ठेवू शकणार आहात. जिल्हा परिषदेच्या वतीने त्यासाठी एका अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून तुमच्या गावात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीचे एखादे काम सुरू आहे का? ते कधी पूर्ण होणार आहे. त्यासाठी किती खर्च येणार अशी माहिती घरबसल्या मिळणार आहे. यामुळे कामांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
78 प्रकारची विकास कामे
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध 78 प्रकारची विकास कामे केली जातात. वर्षाकाठी या कामांची संख्या 15 ते 17 हजारांपर्यंत जाते. या कामांसाठी विविध प्रकारच्या निधीचे वाटप होते. या कामांमध्ये गावात पक्के रस्ते उभारणे दिवा बत्तीची सोय करणे, विविध प्रकारच्या प्रशासकीय इमारतींचे बांधकाम अशा अनेक कामांचा समावेश असतो. मात्र या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याने भष्टाचार होण्याची शक्यता अधिक असते. मात्र आता जिल्हा परिषदेकडून असे अॅप विकसीत करण्यात आले आहे. ज्या अॅपच्या माधमातून तुम्हाला संबंधित कामांवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला देखील तो करत असलेल्या सर्व कामाची नोंदणी या अॅपमध्ये करावी लागणार आहे.
तीस टक्के वेळीची बचत
याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, हे अॅप अतिशय उपयुक्त असे आहे. या अॅपमुळे दस्ताऐवजाचे डिजिटलायझेशन करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेळेत तीस टक्क्यांची बचत होणार असून, खर्च देखील वाचणार आहे. तसेच तुमच्या विभागात नेमके कोणते काम चालले आहे. ते कशापद्धतीने केले जात आहे. त्यासाठी किती खर्च येणार आहे या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती मिळणार आहे.