Rule Change : 1 जुलैपासून होतील हे बदल, खिशाला बसेल झळ
Rule Change : 1 जुलैपासून पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडर, सीएनजी, पीएनजीच नाही तर इतर अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. काय तुमचे किचन बजेट कोलमडणार का?
नवी दिल्ली : जुलै महिना उद्यापासून सुरु होत आहे. 1 जुलैपासून घरगुती गॅस सिलेंडर (Gas Cylinder) पासून तर इनकम टॅक्सपर्यंत, अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही नियमात बदल होतो. काही सेवांचे शुल्क, दर वाढतात. काही वस्तूंच्या किंमतीत बदल होतो. 1 जुलैपासून नियम बदलतील (Rule Change) . त्याचा फटका तुमच्या खिशाला बसेल. एलपीजी गॅस सिलेंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे. आधार-पॅन जोडणी न केल्याचा फटका बसेल. परिणामी अनेक कामे खोळंबण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या भावात चढउतार सुरु आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कच्चे तेस स्वस्त आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चा इंधनाच्या आघाडीवर दिलासा आहे. पण देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत आली नाही. परिणामी नागरिकांमध्ये नाराजी आहे. नाराजी रोषात बदलण्याअगोदरच केंद्र सरकार पाऊल उचलण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सर्व गोष्टी अनुकूल असल्याचे संकेत दिले. इंधन कपातीचा चेंडू तेल कंपन्यांकडे टोलावला.
गॅस सिलेंडर भाव मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची कपात झाली होती. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅसधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात झाली होती. पण मे आणि जून महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर धारकांना कसलाच दिसाला मिळाला नाही. 1 जुलै रोजी हा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 14 किलोच्या गॅसच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
पॅन-आधार लिंकिंग आज, 30 जून ही पॅन कार्डसोबत आधार कार्ड जोडणी करण्यासाठी शेवटची तारीख आहे. ही दोन्ही महत्वाची कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. हे कार्ड जोडले नसतील तर प्राप्तिकर रिटर्न भरण्यात अडचण येऊ शकते. तसेच बँकेतील व्यवहार, शेअर बाजारातील व्यवहारात अडचण येऊ शकते. यापूर्वी पॅन-आधार कार्ड जोडणी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती.
ITR फाईल करण्याची मुदत आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. करदात्यांना दरवर्षी आयटीआर फाईल करावा लागतो. जर त्यांनी आयटीआर फाईल केले नाही तर याच महिन्यात वेळेपूर्वीच ते फाईल करा. 31 जुलैपूर्वी आयटीआर फाईल केले नाही तर तुम्हाला 5000 रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागेल.
CNG-PNG च्या किंमतीत बदल घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत जसा बदल होतो, तसाच बदल CNG-PNG च्या किंमतीत होतो. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबई शहरांसाठी CNG-PNG संबंधीचे दर बदलवितात. यापूर्वी एप्रिल मध्ये दिल्ली आणि मुंबईत CNG-PNG च्या किंमतीत कपात झाली होती. मे महिन्यात ग्राहकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. या मेट्रो शहरातील चाकरमान्यांचे लक्ष 1 जुलैकडे लागले आहे. यावेळी भावात कपात होते की दरवाढ होते, हे स्पष्ट होईल.