मुलांच्या नावे करा इन्व्हेस्ट, म्युच्युअल फंडचा पर्याय एकदम बेस्ट
Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही थेट जोखिमीची नाही आणि त्यात परतावा पण जोरदार मिळतो. शेअर बाजारापेक्षा अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकता. त्यासाठीची प्रक्रिया एकदम सोपी आहे.
नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : म्युच्युअल फंडमध्ये मुलांच्या नावे पण तुम्ही गुंतवणूक करु शकता. त्यामुळे मुलांचे भविष्यातील शिक्षण आणि मोठ्या खर्चासाठी पैसा गाठीशी राहतो. शैक्षणिक कर्ज काढण्याची गरज भासत नाही. लग्न कार्यासाठी सावकाराकडे, आप्तेष्ठांकडे हात पसरावे लागत नाही. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी वेळ द्यावा लागतो. पण म्युच्यअल फंडातील गुंतवणुकीसाठी असा वेळ द्यावा लागत नाही. तुम्ही सहजरित्या योग्य फंड निवडून त्यात गुंतवणूक करु शकता. लहान मुलांच्या नावे गुंतवणुकीचा अजून एक फायदा म्हणजे, ही गुंतवणूक अनेक वर्ष करता येते. कमी वयात मुलांच्या नावे गुंतवणूक केल्यास भविष्यात ती अनेक वर्षे सुरु ठेवता येते आणि त्याचा फायदा मुलांना त्यांच्या उमेदीच्या काळात होतो. कदाचित तुमच्या या गुंतवणुकीमुळे त्यांना वयाच्या 40 पर्यंत करोडपती तर सहज होता येईल.
मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची प्रक्रिया
लहान मुलांच्या नावे ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडात खाते उघडताना तुम्हाला मुलाचे जन्म प्रमाणपत्र, आई-वडील, पालकाचे ओळखपत्र, रहिवाशी पुरावा सादर करावा लागतो. त्यासंबंधीची कागदपत्रे द्यावी लागतात. मुलाची आणि आई-वडिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नावे गुंतवणूक करता येते. योग्य म्युच्युअल फंड निवडून गुंतवणुकीचा श्रीगणेशा करता येतो. गुंतवणुकीसाठी एसआयपी हा चांगला पर्याय ठरु शकतो. त्यामुळे दरमहा एक ठराविक बचत करता येईल. त्यावर चक्रव्याढ व्याजाची रक्कम जमा झाल्यानंतर पुढील 15 वर्षांत मोठी रक्कम तयार होईल.
कराचे गणित असे
आयकर नियम 64 नुसार, जर मुलाचे वय 18 वर्ष असेल आणि म्युच्युअल फंडची विक्री केली. त्यातून जो कॅपिटल गेन होईल. त्यात आई-वडिलांना आयकर भरावा लागेल. पण मुलं जर 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असेल तर या कमाईवर त्याला कराचा भरणा करावा लागेल. त्याला कर द्यावा लागेल. तुम्ही मुलाच्या नावे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर म्युच्युअल फंड विक्रीचा पैसा केवळ मुलाच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे मुलाचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.