रस्ते अपघातातील पिडीतेला एक कोटीची नुकसान भरपाई, या कोर्टाने दिला आदेश
याचिकाकर्त्या या शाळकरी विद्यार्थीनी असताना त्या शाळेतून घरी जात असताना एका वाहनाने ठोकरल्याने त्यांच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे लुळा झाला होता.
नवी दिल्ली : एका रस्ते अपघात प्रकरणात कायम अपंगत्व आलेल्या एका तरुणीला 1 कोटी 12 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 14 वर्षांपूर्वी याचिकाकर्त्या महिलेला एका वाहनाने ठोकरल्याने तिच्या कमरेखालील भागातील संवेदना नष्ट होऊन तिला कायमस्वरूपी अपंगत्व येत व्हीलचेअरवर बसावे लागले आहे. ही महिला अपघात झाला तेव्हा केवळ अकरा वर्षांची होती. महिलेने मोटार अपघात दावा प्राधिरणाच्या याआधीच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाच आव्हान दिले होते.
दिल्ली हायकोर्टात या महिलेच्या वतीने बोलताना तिच्या वकीलांनी बाजू मांडताना सांगितले की अपघातानंतर तिच्या कमरेखालचा भाग लुळा झाला असून तिला आता आयुष्यभर दुसऱ्यावर विसंबून रहावे लागणार आहे. याचिकेत दिल्लीच्या मोटार अपघात लवादाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणात कोणत्याही मुद्दावर नीट विचार केला नव्हता असा आरोप करण्यात आला होता. रस्ते अपघातानंतर कोणत्याही मानवी दृष्टीकोनातून विचार न करता केवळ 47 हजाराची नुकसान भरपाई दिली होती. हायकोर्टाने सर्व बाजूचा विचार करून आता नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करीत ती 1 कोटी 12 लाख इतकी केली आहे.
हायकोर्टात आवाहन केले
याचिकाकर्त्या ज्योती सिंह या शाळकरी विद्यार्थीनी असताना त्या शाळेतून घरी जात असताना एका वाहनाने ठोकरल्याने त्यांच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे लुळा झाला होता. त्यावेळी याचिकाकर्त्या या केवळ अकरा वर्षांच्या होत्या. त्यांनी साल 2008 मध्ये मोटार अपघात दावा लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी मोटार लवादाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आवाहन केले होते. त्यावर न्या.नाझमी वजिरी यांनी निकाल देत याचिका कर्त्याला 1 कोटी 12 लाख रूपयांची नुकसान भरपाई करण्याचा निकाल दिला आहे.