मुंबई : राज्य शासनाच्या (State Government) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप (Startup) सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विभागाचे मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मे पर्यंत असणार आहे. स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अव्वल 100 स्टार्टअप्सना संधी देण्यात येते.
निवडण्यात आलेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या 24 स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्त्वावर संबंधित शासकीय विभागांबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत 15 लाख रुपयांपर्यंतच्या कार्यादेश ‘वर्क-ऑर्डर्स’ दिल्या जातात. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांचा समावेश असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह या उपक्रमाच्या आतापर्यंत चार आवृत्त्या आयोजित केल्या गेल्या असून, विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम केले आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीस नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता उपक्रमाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदा आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहामध्ये राज्यासह देशभरातील कल्पक नवउद्योजक, तरुण-तरुणींनी सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.