Pan Aadhaar Linking : पुन्हा वाढणार का पॅन-आधार लिंक करण्याची डेडलाईन, कोट्यवधींना दिलासा मिळणार?
सरकारने आधार - पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढवून दिली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत हे काम मोफत केले जात होते. आता यासाठी 1000 रू. शुल्क आकारले जात आहे, आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार आहे.
नवी दिल्ली : पॅनकार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च असून जशी जशी तारीख जवळ येत आहे तशी ज्यांनी हे काम केलेले नाही त्यांना चिंतेने घेरलेले आहे. आयकर विभागाने दिलेली डेडलाईन आता केवळ तीन दिवस उरलेले आहेत. आयकर विभागाच्या आकडेवारीनूसार अजूनही देशातील दोन कोटी नागरिकांचे पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यात आलेले नाही. परंतू अशा लोकांसाठी आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॅनकार्ड आधारला जोडण्याची डेडलाईन पुन्हा एकदा वाढू शकते असे म्हटले जात आहे.
इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनूसार सरकार पॅन – आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढविण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यांनी सांगितले की सरकार याबाबत केव्हाही नोटीफिकेशन काढू शकते. याचा अर्थ आधारकार्डला पॅनकार्डशी जोडण्यासाठी लोकांना आणखी काही वेळ देण्याच्या मनस्थितीत सरकार आहे. जे करदाते सवलत असलेल्या कॅटेगरीत नाहीत त्यांना 31 मार्चपूर्वी आपले पॅनकार्ड आधारला जोडावे लागणार आहे, सध्या हे काम एक हजार रूपये फि भरून करता येत आहे.
पूर्वी देखील वाढविली होती डेडलाईन
सरकारने आधार – पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढविली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत हे काम मोफत केले जात होते. परंतू 1 एप्रिल 2022 नंतर हे काम करण्यासाठी 500 रूपये फि आकारली जात होती. नंतर 1 जुलैनंतर एक हजार रूपये फि आकारली जात आहे. सध्या 31 मार्चपर्यंत याच शुल्कावर पॅन- आधारकार्डशी लिंक केले जात आहे.
का आवश्यक आहे लिंक करणे
इन्कम टॅक्सचा कायदा कलम 139 अअ नूसार 1 जुलै 2017 पूर्वी सर्व पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. सरकारने जुलै महिन्यात संसदेत सांगितले होते की आतापर्यंत 61,73,16,313 लोकांना पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे. यात 46,70,66,691 लोकांनी आपले पॅनकार्डला आधार कार्डाशी लिंक केले आहे.
तीन कॅटगरीला मिळाली सूट
इन्कम टॅक्स विभागाने तीन वर्गवारीच्या लोकांना आधार लिंक करण्यापासून सूट दिली आहे. यात आसाम, जम्मू-कश्मीर आणि मेघालय राज्यातील नागरिक आणि अनिवासी भारतीय म्हणजे एनआरआय लोकांना सूट देण्यात आली आहे. तसेच 80 वर्षांवरील व्यक्तींनाही आधार – पॅनकार्ड लिंक करण्यापासून सूट आहे. या वर्गवारी वगळता सर्वांना पॅन – आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.