पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका, लग्नातील जेवणही महागले
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका आता लग्नाला देखील बसत असल्याचे दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागल्याने सर्वच वस्तूंच्या दारत 15 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
पेट्रोल (Petrol), डिझेल (diesel), सीएनजी, पीएनजी, एलपीजी अशा सर्वच प्रकारच्या इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका हा नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे वस्तूंच्या दरात देखील वाढ झाल्याने गृहिनीचे बजेट कोलमडले आहे. एवढेच नव्हे तर वाढत्या इंधन दराचा फटका आता थेट विवाह समारंभाला देखील बसत असल्याचे पहायला मिळत आहे. इंधनाचे भाव वाढल्यामुळे लग्न (wedding) करणे महाग झाले आहे. स्नेहभोजनाच्या किमतीत 15 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने बासमती तांदूळ, भाजीपाला, दाळ, आटा अशा सर्वच गोष्टी महाग झाल्याने लग्नाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. लग्नाचा खर्च वाढल्याने लग्न इच्छूक तरुणांच्या चिंतेत भर पडली आहे.
दोन वर्ष कोरोनाचे सावट
एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा हा लग्नसराईचा काळ असतो. मात्र गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. तसेच लोकांच्या उपस्थितीवर देखील मर्यादा होती. अनेक दिवस जमावबंदीचे आदेश होते. त्यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र सध्या लग्न इच्छूकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे लग्नातील जेवन महाग झाल्याने खर्च वाढला आहे. भरीसभर म्हणजे मजुरीत देखील वाढ झाली आहे.
हॉटेलमधील जेवणाचे दर देखील वाढले
हॉटेलमधी जेवणाच्या दरात सुद्धा वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. पुर्वी एका राईसप्लेटसाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता त्याच जेवणासाठी 100 ते 110 रुपये द्यावे लागत आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. सोबतच व्यवसायिक गॅस सिलिंडरमध्ये देखील वाढ झाल्याने आता पूर्वीच्या दरात जेवण देणे परवडत नाही. जेवणाचे दर वाढून देखील मार्जीनमध्ये घट झाल्याची प्रतिक्रिया हॉटेल चालक आणि मेस चालक देत आहेत.