नवी दिल्ली: उत्तर रेल्वेकडून कौशल्य विकास योजनेतंर्गत 3500 तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लखनऊ आणि वाराणसी याठिकाणी हे प्रशिक्षण शिबीर पार पडले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यास संबंधितांना रेल्वेत नोकरीची संधी मिळू शकते. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.
उत्तर रेल्वेचे महाप्रबंधक आशुतोष गांगल यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतंर्गत देशातील तरुणांना रेल्वेशी संबंधित प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. केंद्र सरकारने 2015 साली कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ केला होता.
भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात आणि उत्पादन प्रकल्पांमध्ये आगामी तीन वर्षांमध्ये तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वेच्या वाराणसी लोकोमोटिव वर्क्स अंतर्गत त्यासाठी नोडल प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
रेल्वेकडून प्रामुख्याने फिटर आणि इलेक्ट्रिशिअन या पदांसाठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी 100 तासांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये 70 टक्के प्रॅक्टिकल आणि 30 टक्के थिअरीचा समावेश असेल. 20 ऑगस्टपासून प्रशिक्षणासाठी अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
प्रशिक्षणासाठी नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम nr.indianrailways.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर भरती प्रक्रियेच्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला रेल कौशल्य विकास योजना हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर प्रशिक्षणासाठी संपूर्ण फॉर्म भरावा. या अर्जांची छाननी करुन रेल्वेकडून प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
संबंधित बातम्या:
PGCIL Recruitment 2021: पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर्सना मोठी संधी, 1 लाखांपर्यंत पगार मिळणार
Bank Job 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज