‘PNB’चा आपल्या ग्राहकांना मोठा धक्का, सलग दुसऱ्या महिन्यात व्याज दरात कपात
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या बचत खात्याच्या (Savings Account) व्याज दरामध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. नवे व्याजदर चार एप्रिलपासून लागू झाले आहेत.
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या बचत खात्याच्या (Savings Account) व्याज दरामध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. बँकेच्या नव्या व्याज दरानुसार ज्या ग्राहकांची बँकेत दहा लाखांपेक्षा कमी ठेव आहे, अशा ग्राहकांना आता 2.70 टक्के वार्षिक आधारावर व्याज मिळणार आहे. तर ज्या ग्राहकांचे बँकेत दहा लाख ते पाचशे कोटी पर्यंतची ठेव आहे, अशा ग्राहकांना बँकेच्या वतीने आता वार्षिक आधारावर 2.75 टक्के व्याज (Interest) देण्यात येणार आहे. नवे व्याज दर चार एप्रिल 2022 पासून लागू झाल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून याबाबत एक नोटीस काढण्यात आली आहे, या नोटीमध्ये बँकेने म्हटले आहे की, बँकेने बचत खात्यावरील व्याज दरात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, हे नियम भारतीय तसेच एनआरआय अशा सर्वच खात्यांसाठी लागू असणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांमध्ये दुसऱ्यांना बँकेने आपल्या व्याज दरात बदल केले आहेत.
दोन महिन्यात दोनदा व्याजामध्ये कपात
गेल्या दोन महिन्यांमध्ये पंजाब नॅशनल बँकेने दोनदा बचत खात्यावरील व्याज दरात कपात केली आहे. याचा मोठा फटका हा गुंतवणूकदारांना बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा व्याज दरात कपात करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कपातीनुसार दहा लाखांच्या आत ज्या ग्राहकांच्या ठेवी आहेत, त्यांना वार्षिक आधारावर 2.75 टक्के व्याज देण्यात आले होते. तर ज्या ग्राहकांच्या दहा लाख ते पाचशे कोटींपर्यंत ठेवी आहेत, त्या ग्राहकांना वार्षीक आधारावर 2.80 टक्क्यांनी व्याज देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,. नव्या व्याज दरानुसार आता ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर केवळ 2.70 तर दहा लाखांपेक्षा अधिक रकमेवर 2.75 टक्क्यांनी व्याज मिळणार आहे. बँकेकडून दोनही वेळेस 0.5 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
दंडाची रक्कम वाढवली
एवढेच नव्हे तर पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांकडून मोठ्याप्रमाणात दंड देखील वसूल करत असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीमध्ये बँकेने केलेल्या घोषणेनुसार जर एखाद्या ग्राहकाचा इएमआय चुकला तर त्याच्याकडून 250 रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. तर चेक बाउंस झाल्यास देखील मोठ्याप्रमाणात दंड आकारण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर बँकेकडून सरासरी बॅलन्सची सीमा वाढून तीन महिन्यांसाठी पाच हजार रुपये करण्यात आली आहे. हे सर्व नियम चार एप्रिलपासून लागू करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे.