राज्यात निवासी डॉक्टरांचा संप सुरूच, आज दुसरा दिवस, आरोग्य सेवा कोलमडली, काय Updates?
कालपासून राज्यातील 22 सरकारी रुग्णालयांतील 7 हजार डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.
मुंबईः राज्यातील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी (Residential Doctors) संप पुकारल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. मार्ड (MARD) संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य करावी, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलन मागे घेण्याची मागणी केल्यानंतरही डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला आहे.
मुंबईतील 2 हजार तर राज्यभरातील 6 हजार डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांतील ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील जेजे, नायर, केईएम, कूपर, सायन अशा मोठ्या रुग्णालयांतील डॉक्टर्स या संपात सहभागी झाले आहेत.
बहुतांश रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा सुरु आहे. मात्र मागण्या मान्य न केल्यास अधिक आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा मार्ड संघटनेने दिला आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं.
मार्ड संघटनेच्या मागण्या काय?
- निवासी डॉक्टरांचं 2018 पासूनचं थकीत वेतन द्या आणि वरिष्ठ डॉक्टरांची पदभरती करा ही मार्ड संघटनेची प्रमुख मागणी आहे.
- राज्यातील 1 हजार 432 निवासी डॉक्टरांची नवी पदनिर्मिती करा, अशी मागणी आहे.
- राज्यातील सर्वच निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे
- शासकीय वैद्यकीय वसतिगृह आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधांमुळे निवासी डॉक्टरांचे हाल सुरु आहेत. त्यात सुधारणा करण्याची मागणी मार्ड संघटनेनं केली आहे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्याप्रमाणात कॉलेजही वाढले आहेत. मात्र तेथे प्राध्यापकांची भरतीच केली जात नाही, असं मार्डचं म्हणणं आहे.
या प्रकरणी अनेक दिवसांपासून आरोग्य मंत्री तसेच इतर अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु होत्या. मात्र सरकारतर्फे केवळ आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे मार्ड संघटनेने 2 जानेवारीपासून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार कालपासून राज्यातील 22 सरकारी रुग्णालयांतील 7 हजार डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.
महाराष्ट्र असोसिएसन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) संघटनेतील हजारो डॉक्टरांना या संपात सहभाग नोंदवल्यामुळे विविध जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयात रुग्णाचे हाल सुरु आहेत.