गडी किंमतीनं कमी मात्र परताव्यात देतो जादा हमी, ऑटोमोबाईल क्षेत्रातील हा शेअर घेतलात का?
तर मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील या शेअरची सध्या चर्चा रंगली आहे. गुंतवणुकदारांच्या अगदी अवाक्यात असलेल्या या शेअरने पडत्या काळातही गुंतवणुकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.
Automobile Sector Share:शेअर बाजार (Share Market) सध्या गटांगळ्या खात आहे. बाजाराने मंदीचा आणि ब-याच गोष्टींचा कमालीचा धसका घेतला आहे. त्यातच परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी (FII) बाजारातून पळ काढल्याने बाजाराची अवस्था क्या करु, क्या ना करु, यह कैसी मुश्किल हाय अशी झाली आहे. मार्केटला कोणाची नजर लागली बघा नी त्याचं पार वाटोळं होत आहे. गुंतवणुकदारांचे (Investor) तर लाखो कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. परंतू अशा ही गर्तेत एक चांगली बातमी आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील सुमी वायरिंग इंडिया (Motherson Sumi Wiring India) हा शेअर भल्या भल्या दादांना मागे टाकत कमाल कामगिरी करु शकतो. गडी किमतीनं कमी, मात्र परताव्यात देतो जादा हमी, असला सगळा मामला आहे. या स्वस्तातील शेअरने बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. अगदी 100 रुपयांच्या आत असलेला हा शेअर अशा हेलकाव्यातही दमदार कामगिरी बजावले असा व्होरा ब्रोकरेज हाऊसने दिला आहे.
ब्रोकरेज फर्मही छोटेलालवर फिदा
ऑटोमोबाईल क्षेत्रातील या छोटेलालवर ब्रोकरेज फर्मही फिदा आहेत. मोतीलाल ओसवाल यांनी ऑटो कंपोनंट कंपनी मदरसन सुमी वायरिंग हा शेअर गुंतवणुकदारांना खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनीला येत्या काही काळात ऑटोमधील ईव्ही आणि इतर मेगाट्रेंडचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. मदरसन सुमी सिस्टिमची नुकतेच डिमर्जर झाले. त्यानंतर मार्च 2022 मध्ये मदरसन सुमी वायरिंग स्टॉक नावाने हा शेअर बाजारात सुचीबद्ध झाला. त्यावेळी हा शेअर बीएसई निर्देशांकावर 66 रुपयांवर खेळत होता.
एवढयात दाखवला दमखम
बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर बाजारात चाचपडत असताना मदरसन सुमी वायरिंगचा शेअर मात्र दमखम दाखवत आहे. या पडझडीत या कंपनीच्या शेअरला ही दणका बसला. पण इतरांपेक्षा हा शेअर सध्या तरी स्पर्धेत टिकून आहे. 17 जून 2022 रोजी हा शेअर बाजारात 60 रुपयांपर्यंत खाली आला होता. ओसावाल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 80 रुपये टार्गेट किंमत ठेवली आहे. ब्रोकरेज फर्मच्या अनुमानानुसार, सध्यापेक्षा हा शेअर 33 टक्के अधिकचा परतावा देऊ शकतो.
का आहे एवढा विश्वास
ब्रोकरेज फर्मला या शेअरवर एवढा विश्वास का आहे ते समजून घेऊयात. सुमितोमो वायरिंग सिस्टम आणि मदरसन ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमातून हा शेअर बाजारात दाखल झाला आहे. भारतातील वायरिंग हार्नेस उद्योगातील बाजारपेठेतील हा दिग्गज खेळाडू मानण्यात येतो. कंपनीचा या क्षेत्रातील मार्केट शेअर 40 टक्क्यांहून अधिक आहे. कंपनीने मजबूत नफा मिळविला आहे. या दोघांच्या मिलाफानंतर नव्या कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
टिपः बाजार हा जोखमीचा आहे. तेव्हा आर्थिक सल्लागार ,बाजारातील तज्ज्ञ आणि अभ्यास यातून गुंतवणुकदारांनी त्यांची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.