पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘या’ तीन योजनांना सात वर्ष पूर्ण, अवघ्या 312 रुपयांमध्ये मिळतो 4 लाखांचा फायदा
मोदी सरकारकडून जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेंशन विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेला आज सात वर्ष पूर्ण झाले.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या समाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) आणि अटल पेंशन योजना (Atal Pension Yojana) यांना आज सात वर्ष पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) 9 मे 2015 रोजी या योजना सुरू केल्या होत्या. या योजनांच्या माध्यमातून जनतेला परवडणाऱ्या दरात विमा कवच तसेच सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येते. सोबतच अटल पेंशन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना वृद्धापकाळात पेंशनचा देखील लाभ देण्यात येते आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 28.37 कोटी सदस्यांची नोंद झाली आहे. या योजनेंतर्गंत 312 रुपयांमध्ये 4 लाख रुपयांचा विमा मिळतो.
‘जनतेच्या सामाजिक सुरक्षेसाठी योजना’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनांना आज सात वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे की, गेल्या सात वर्षांमध्ये वाढत असलेली सदस्य संख्या हीच या योजनांची खरी ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीबातील गरीब लोकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, चांगल्या आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा तसेच वृद्धापकाळात उपजिविकेचे एखादे साधन हाती असावे या उद्देशातून या योजना सुरू केल्या आहेत. पूर्वी पेंशनची सुविधा काही निवडक लोकांसाठी उपलब्ध होती. मात्र आता पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या अटल पेंशन योजनेमुळे सर्वांनाच पेंशनचा लाभ घेणे शक्य होत आहे.
जीवन ज्योती अंतर्गत 12.76 कोटी जणांची नोंदणी
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 12.76 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेत तुम्ही दरवर्षी 330 रुपये भरून, दर वर्षाला दोन लाखांचे विमा कव्हर मिळू शकता. यो योजनेत दरवर्षी विम्याचे नुतनीकरण करावे लागते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अपघात सुरक्षा विमा योजना आहे. अपघातामध्ये मृत्यू झाल्यास, किंवा दिव्यांग झाल्यास तुम्हाला मदत मिळते. या विमा योजनेचा वार्षिक हप्ता अवघा बारा रुपये इतका आहे. या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. अटल पेंशन योजनेंतर्गत तुम्हाला विम्याचा लाभ मिळू शकतो.