Money Transfer : झाली का पंचाईत, दुसऱ्याच बँक खात्यात गेले पैसे, आता कसे मिळवायचे परत
Money Transfer : झाली का चूक, एका आकड्याने घातला घोळ, दुसऱ्याच बँक खात्यात पैसे केले का ट्रान्सफर, आता परत मिळवायचे कसे, एसबीआयने सांगितली ही ट्रिक..
नवी दिल्ली : ऑनलाईन बँकिंगमुळे (Online Banking) आपण अवघ्या काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करु शकतो. पण ही सुविधा जितकी सोपी आणि सरळ वाटते, तेवढीच जोखीमयुक्त पण आहे. अनेकदा गडबडीत, घाईघाईत चुकून दुसऱ्याच्याच खात्यात रक्कम वळती होते. हे पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा होतात. बरं ती व्यक्ती काही जवळची, ओळखीच नसते. त्यामुळे ती काही पैसे परत करत नाही, अथवा कधी कधी खात्यात रक्कम पडल्याचे त्याला पण माहिती नसते. अशावेळी चुकून दुसऱ्या खात्यात जमा केलेली रक्कम (Wrong Transaction) परत कशी मिळवाल, त्यासाठी कोणते पाऊल टाकावे लागेल?
Twitter वर तक्रार एका व्यक्तीने ट्विटरवर अशी तक्रार केली होती. त्याने चुकून रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा केली होती. त्याला काही सुचलं नाही तर त्याने ट्विटरवर त्याची कैफियत मांडली. त्यावेळी भारतीय स्टेट बँकेने (SBI) त्याला ही रक्कम परत मिळविण्यासाठी पद्धत सांगितली. तुम्ही पण पैसे हस्तांतरीत करताना अशीच चूक केली असेल तर या सोप्या पद्धतीने रक्कम परत मिळवता येईल.
काय आहे ट्विट रवी अग्रवाल नावाच्या ग्राहकाने ट्विटरवर एक पोस्ट केली. त्यात @TheOfficialSBI ला त्याने टॅग केले. चुकून रक्कम दुसऱ्याच खात्यात गेली आहे आणि ती परत कशी मिळवायची, असे अग्रवाल यांनी विचारले. तसेच संबंधीत शाखेत व्यवस्थापक वा इतर कोणीच योग्य माहिती देत नसल्याची तक्रार अग्रवाल यांनी केली. त्यावर चुकीच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत केल्यावर काय उपाय करावेत, याची माहिती एसबीआयने दिली आहे.
कुठे आणि कशी कराल तक्रार जर एखाद्या ग्राहकाने चुकून दुसऱ्याच खात्यात रक्कम हस्तांतरीत केली, खाते क्रमांक टाकताना एखादा अंक चुकला तर ती रक्कम दुसऱ्याच खात्यात वळती होते. अशावेळी ग्राहकाने तातडीने याची माहिती त्याच्या बँकेला देणे आवश्यक आहे. बँकेच्या शाखेत जाऊन त्याने ही माहिती द्यावी. तुमच्या बँक शाखेने मदत केली नाही तर ग्राहकाला https://crcf.sbi.co.in/ccfunder या ठिकाणी तक्रार करता येते. तसेच ग्राहक NPCI पोर्टलवर तक्रार करु शकतो.
काय म्हणते RBI? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, ऑनलाईन पेमेंट दरम्यान एखाद्यावेळी ग्राहकाकडून गडबड होऊ शकते. ही रक्कम दुसऱ्याच खात्यात हस्तांतरीत होते. ग्राहकाने त्वरीत तक्रार केल्यास बँकेची ही जबाबदारी असते की त्यांनी 48 तासात ही रक्कम ग्राहकांना परत करावी. आरबीआयच्या निर्देशानुसार, सर्वात अगोदर तुम्ही ज्या खात्यातून ही रक्कम हस्तांतरीत केली, ती बँक अथवा फिनटेक कंपनीकडे तातडीने तक्रार करावी. GPay, PhonePe, Paytm वा UPI ॲपच्या कस्टमर केअरकडे तक्रार करावी.
येथे करा तक्रार युपीआय अथवा नेट बँकिंगने चुकीच्या खाते क्रमांकावर रक्कम वळती झाल्यास सर्वात अगोदर 18001201740 या क्रमांकावर तक्रार करता येईल. त्यानंतर संबंधित बँकेच्या शाखेत जा. त्याठिकाणी रीतसर अर्ज द्या. जर बँक मदत करत नसेल तर त्याची तक्रार bankingombudsman.rbi.org.in याठिकाणी करता येईल.