नवी दिल्ली : अॅमेझॉनकडून (Amazon) तुम्ही सामान मागवत असाल तर तुम्हाला आता आणखी एक सुखद धक्का बसणार आहे. अॅमेझॉन कंपनी मोठं सामाजिक दायित्व निभावणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही या कंपनीचे कौतुक वाटणार आहे. तर या कंपनीने असं काय केलं की, ती एकदम चर्चेत आली, ते पाहुयात..
तर आतापर्यंत तुमच्याकडे अॅमेझॉनचा डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) पेट्रोलच्या बाईकवर येत होता. पण आता यात बदल होणार आहे. अॅमेझॉन आता प्रदूषण मुक्त (Pollution Free) डिलिव्हरीसाठी योजना आखत आहे. त्यासाठी अॅमेझॉनने खास प्लॅन तयार केला आहे.
अॅमेझॉन इंडिया त्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीसोबत करार करणार आहे. या करारानुसार, अॅमेझॉन इंडिया देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे देशभरात अॅमेझॉनच्या डिलव्हिरीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग होणार आहे. दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात याविषयीची माहिती दिली.
या योजनेतंर्गत TVS कंपनीच्या EV चा वापर होणार आहे. यामाध्यमातून ग्राहकांपर्यंत सामानाची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. त्यासाठी टिव्हीएसच्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा वापर करण्यात येणार आहे.
या दोन कंपन्या एवढ्यावरच न थांबता दळणवळणासाठी इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर वाढविण्याबाबतच्या संधी शोधणा आहेत. तसेच त्यावर लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे.
पर्यावरण पूरक भूमिका अजून मजबूत करण्यासाठी अॅमेझॉन कंपनीने फार मोठे लक्ष्य आणि उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कंपनी 2040 पर्यंत जगातील शून्य कार्बन उत्सर्जन करणारी कंपनी होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरु असल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनू सक्सेना यांनी सांगितले.
अर्थात हा निर्णय अॅमेझॉन सोबत काम करणाऱ्या डिलिव्हरी कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. पण या थर्ड पार्टी फर्मला अॅमेझॉनच्या या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. ईकॉम, ब्लू डार्ट आणि इंडिया पोस्ट या सारख्या कंपन्यांना या प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे.