ना शिमला ना मसूरी, दिल्लीच्या थंडीनं दातखिळी बसायची वेळ, IMD चा पुढचा अंदाज काय?
उत्तर भारतात थंडीच्या तीव्र लाटेमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. थंडीमुळे पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका आल्याने 25 जणांचा मृत्यू झाला.
नवी दिल्लीः उत्तर भारत (North India), हरियाणा, पंजाब, दिल्लीसहित (Delhi) उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. कुडकुडणाऱ्या थंडीनं नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालाय. रस्त्यावर ठिक-ठिकाणी लोक शेकोट्या पेटवत आहे. एरवी देशात सर्वाधिक थंडी असणाऱ्या ठिकाणांमध्ये डलहौजी, शिमला, डेहराडून आणि नैनीताल यांचा समावेश होतो. पण यंदा दिल्लीच्या पाऱ्यानं सर्वाधिक घसरण घेतली आहे. थंडीसोबत दाट धुक्यांनी वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. खराब हवामानामुळे ट्रेन लेट होत आहेत. विमानांचे उड्डाणही विलंबाने होत आहेत.
दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी थंडीच्या लाटेचा तडाखा बसतोय. नैऋत्य दिल्लीतल्या आयानगर येथील किमान तापमान तब्बल 1.8 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलंय.
भारतीय हवामान शास्त्र विभाग अर्थात IMD च्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच ७ जानेवारीपासून थंडी थोडी कमी होईल. जम्मू काश्मीरमध्ये किमान तापमानात थोडी सुधारणा होईल. खोऱ्यातही थंडीचा भीषणपणा काहीसा कमी होईल.
दिल्लीत कडाक्याची थंडी
दिल्लीतल्या सफदरजंग या प्रमुख वेधशाळेत किमान तापमान 4 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. डलहौजी (8.7 अंश सेल्सियस), धर्मशाळा (5.4 अंश सेल्सियस), शिमला (6.2 अंश सेल्सियस), डेहराडून (4.4 अंश सेल्सियस), मसूरी (6.4 अंश सेल्सियस) आणि नैनीताल (6.5 अंश सेल्सियस)पेक्षाही कमी आहे.
राजस्थानच्या सीकर येथील फतेहपूर मध्ये किमान तापमान 0.7 अंश सेल्सियस एवढे नोंदवले. त्यानंतर चुरू येथे 1 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
उत्तर भारतात थंडीच्या लाटेचे 25 बळी
उत्तर भारतात थंडीच्या तीव्र लाटेमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. थंडीमुळे पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका आल्याने 25 जणांचा मृत्यू झाला. 17 जण वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीच मरण पावले. उत्तर प्रदेशातल्या कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकारग्रस्त रुग्णांची संख्याही अचानक वाढलेली दिसून आली.