Income Tax Payment | आता काय बोलावे! ऑनलाईन कर जमा करताना सरकार शुल्कासह जीएसटीही वसूल करणार
Income Tax Payment | आता ऑनलाईन प्राप्तीकर जमा करताना शुल्कासह जीएसटी भरावा लागणार आहे. क्रेडिट कार्डद्वारे प्राप्तीकर भरल्यास 0.85 टक्के शुल्क आणि 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. परंतु, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे आयकर भरण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क भरावे लागणार नाही.
Income Tax Payment | आता पुढील वेळी नवीन प्राप्तीकर (Income Tax) भरताना तुम्हाला शुल्कासह जीएसटी जमा करावा लागणार आहे. प्राप्तीकर खात्याने (Income Tax Department) ही माहिती दिली आहे. प्राप्तीकर भरताना आतापर्यंत करदात्याला कुठलेही शुल्क द्यावे लागत नव्हते. परंतु, वेळेत कर न जमा केल्यास त्याला विलंब शुल्क आकारण्यात येत होता. आयकर भरण्यास जास्त उशीर झाल्यास दंडाची (Penalty) आणि कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. आता आयकर विभागाने प्राप्तीकर भरण्यासाठीही शुल्क आणि जीएसटी (GST) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 30,000 रुपयांचा आयकर भरला तर 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. प्राप्तीकर खात्याच्या ई-फायलिंग (E-Filling) या संकेतस्थळावरुन ‘पेमेंट गेटवे’ वापरल्यास तुम्हाला शुल्कासह GST द्यावा लागणार आहे. त्यामुळे करदात्यांचा हिरमोड होणार हे नक्की आहे.
किती भरावे लागेल शुल्क?
या पेमेंट गेटवेमध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI चा समावेश आहे. कर भरताना व्यवहार शुल्क(Transaction Charges) समोर येईल. त्याठिकाणी कोणत्या बँकेकडून, कोणत्या पद्धतीने तुम्ही आयकर भरत आहे, त्याविषयीच्या व्यवहार शुल्काचा तपशील देण्यात येईल. तुम्ही नेट बँकिंगद्वारे HDFC बँकेकडून आयकर जमा करत असाल तर तुम्हाला 12 रुपये व्यवहार शुल्क द्यावे लागेल. ICICI बँकेसाठी 9 रुपये, SBI आणि Axis बँकेसाठी प्रत्येकी 7 रुपये, फेडरल बँक सोडून इतर सर्व बँकांसाठी 5 रुपये व्यवहार शुल्क द्यावे लागेल. या शुल्कासह 18% GST द्यावा लागेल. क्रेडिट कार्डद्वारे प्राप्तीकर भरल्यास 0.85 टक्के शुल्क आणि 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. परंतु, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे आयकर भरण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क भरावे लागणार नाही.
असे द्यावे लागेल शुल्क
आता तुम्हाला किती शुल्क आकारल्या जाईल ते बघुयात. समजा तुम्हाला 30,000 रुपये प्राप्ती कर भरायचा आहे. तुम्ही हा कर क्रेडिट कार्ड पेमेंट मोडद्वारे भरत असाल तर , तुम्हाला 0.85 टक्के कन्व्हेयन्स चार्ज द्यावा लागेल. म्हणजे 255 रुपये शुल्क द्यावे लागेल. त्यावर 18 टक्के जीएसटी म्हणजे 45.9 रुपये द्यावे लागतील. क्रेडिट कार्डद्वारे प्राप्तीकर भरला तर तुम्हाला 30,000 रुपयांवर तुम्हाला 255 रुपये आणि 45.9 असे एकूण 300.9 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. जेवढा आयकर जास्त तेवढे हे शुल्क जास्त द्यावे लागणार आहे.
UPI वरुन पेमेंट विनामूल्य
आता तुम्ही नेट बँकिंगद्वारे प्राप्ती कर भरल्यास बँका जशा शुल्क आकारतात, त्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल. आता तुम्हाला आयकर भरताना शुल्क आणि जीएसटी चुकवायचा असेल तर एक मार्ग आहे. प्राप्तीकर भरताना तुम्ही तो डेबिट कार्ड अथवा युपीआय या पर्यायाद्वारे भरल्यास तुम्हाला व्यवहार शुल्क अथवा जीएसटी द्यावा लागणार नाही. या दोन्ही पेमेंट गेटवेवरून कर भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे आयकर भरताना या पेमेंट गेटवेचा तुम्ही वापर केल्यास व्यवहार शुल्क आणि त्यावरील जीएसटी भरण्याची तुम्हाला गरज राहणार नाही.