नोटांवर कधी आणि कसा आला महात्मा गांधींचा फोटो? त्यांचा फोटो बदलविल्या जाणे शक्य आहे काय? जाणून घ्या चलनासंबंधीत नियम
भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा अशी मागणी केजरीवाल यांच्याकडून केली जात आहे. मात्र हे शक्य आहे का?
मुंबई, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणपती आणि देवी लक्ष्मीचे (Laxmi Ganesh Photo on Notes) फोटो लावण्याची मागणी केली आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या या विधानाकडे ‘हिंदुत्व कार्ड’ म्हणून पाहिले जात आहे. ही मागणी करत केजरीवाल म्हणाले की, नोटांवर एका बाजूला गांधीजी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था गंभीर टप्प्यातून जात आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे, त्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घ्यावा. सर्व नोटा बदलण्याची गरज नाही, मात्र ज्या नव्या नोटा छापल्या जातात त्यावर हा बदल करता येईल, असे सांगत केजरीवाल यांनी नोटांवर गांधीजींचे तसेच गणेश-लक्ष्मीचे चित्र लावण्याची मागणी केली.
अशी मागणी करणारे केजरीवाल हे पहिले नाहीत. यापूर्वी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही दोन वर्षांपूर्वी नोटांवर गणपती आणि देवी लक्ष्मीचे चित्र छापण्याची मागणी केली होती. त्यावेळी स्वामी म्हणाले होते की अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संपत्तीची देवी लक्ष्मीचे चित्र छापले पाहिजे.
महात्मा गांधींचे चित्र असावे असे काहींचे म्हणणे आहे, पण बाकीच्या नोटांवर इतर महापुरुषांचे चित्रही छापले पाहिजे. काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय हिंदू महासभेनेही नोटांवर महात्मा गांधींऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र छापावे, अशी मागणी केली होती.
असे होऊ शकते का?
याचे साधे उत्तर आहे- नाही. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे नोटांवर अशोक स्तंभ किंवा इतर चिन्हे छापण्यात आली.
नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्यात आला होता. गांधीजींशिवाय इतर महापुरुषाचे चित्र छापले असते तर त्यावरून वाद आणि विरोध होण्याची शक्यता होती. यामुळेच नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
निर्णयासाठी नेमली होती समिती
नोटांवर महात्मा गांधींऐवजी दुसऱ्या महापुरुषाचे चित्र छापावे का? याबाबत केंद्रीय रिझर्व्ह बँकेची (RBI) एक समिती स्थापन करण्यात आली होती. नोव्हेंबर 2014 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सांगितले की, आरबीआय समितीने महात्मा गांधींशिवाय इतर कोणत्याही नेत्याचे चित्र न छापण्याचा निर्णय घेतला आहे, कारण गांधीजींपेक्षा देशाच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व कोणीच करू शकत नाही.
काय आहे भारतातील नोटांचा इतिहास?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी तयार झाला. तोपर्यंत रिझर्व्ह बँक फक्त प्रचलित चलनी नोटाच जारी करत होती.
रिझव्र्ह बँकेच्या वेबसाइटनुसार, सरकारने 1949 मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नवी नोट तयार केली. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराजांचं चित्र छापण्यात आलं होतं.
एका वृत्तानुसार, त्यावेळी ब्रिटनच्या महाराजांऐवजी महात्मा गांधींचे चित्र छापण्यात यावे, असे मान्य करण्यात आले होते, मात्र नंतर नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र छापले जाईल, असे ठरले.
1950 मध्ये पहिल्यांदा 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. या सर्व नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र छापण्यात आले होते. 1953 मध्ये नोटांवर हिंदी ठळकपणे छापण्यात आली होती. त्यानंतर 1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आल्या, पण 1978 मध्ये त्या नोटाबंदी करण्यात आल्या, म्हणजेच चलनातून काढून टाकण्यात आल्या.