Stock market : शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूक कमी का होत आहे? जाणून घ्या विदेशी गुंतवणूकदारांचा कल
सध्या भारतीय शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक झपाट्याने कमी होत आहे. त्याचा मोठा फटका हा शेअर मार्केटला बसत असल्याचे दिसून येत आहे. जाणून घेऊयात परदेशी गुंतवणूकदारांचा कल.
मुंबई : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia, Ukraine war) तसेच बदलत्या भू राजकीय परिस्थितीमुळे परदेशी गुंतवणूकदार (Investors) भारतातील गुंतवणूक काढून घेत आहेत. सध्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII मोठ्या प्रमाणात शेअर्सची (Stock) विक्री करत आहेत. जानेवारी ते मार्चदरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 1.10 लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक केलीये. त्यामुळेच नागपुरातील पेट्रोलियम कंपनीत काम करणाऱ्या अश्विनची चिंता वाढलीये. तो शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्यामुळे शेअर बाजारातील प्रत्येक बातमीकडे त्याची नजर असते. आपल्या जवळ असलेल्या शेअर्सची विक्री करून बाजारातून बाहेर पडावे का असा विचार सध्या अश्विनच्या मनात सुरू आहे. शेवटी त्याने न राहवून आर्थिक सल्लागार पंकज जैन यांना फोन केला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार जेवढ्या मोठया प्रमाणात विक्री करत आहेत, तेवढयाच आक्रमकपणे खरेदीसुद्धा करत असल्याची माहिती त्याला पंकज जैन यांनी दिली.
परदेशी गुंतवणूकदार कुठं गुंतवणूक करतात?
मार्चपर्यंतच्या संपलेल्या त्रैमासिकात रेस्टॉरेंट ब्रँड्स एशियामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 28.76 टक्क्यांपर्यंत हिस्सेदारी वाढवलीये. डिसेंबरपर्यंतच्या त्रैमासिकात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा फक्त 17.35 टक्के इतका होता. अशी माहिती ACE इक्विटीच्या आकडेवारीमधून समोर येत आहे. जानेवारी ते मार्च 2022 च्या दरम्यान रेस्टॉरंट ब्रॅड एशियाच्या शेअर्समध्ये जवळपास 29 टक्के इतकी पडझड झाली. तर याच दरम्यान BSE सेन्सेक्स 0.54 टक्क्यांनी वधारला. या कंपनीशिवाय एफआयआयनं इंडिया बुल्स रियल इस्टेटमध्ये 19.88 टक्क्यांहून 25.61 टक्के भागीदारी वाढवलीये. तसेच एंजल वनमध्ये 5.44 टक्क्यांहून 8.96 टक्के, गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकलमध्ये 20.95 टक्क्यांहून 23.79 टक्के, केईआय इंडस्ट्रीमध्ये 21.78 टक्क्यांहून 25.22 टक्के आणि येस बँकेत 8.17 टक्क्यांहून 10.97 टक्के इतकी भागीदारी वाढवली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी City Union Bank, ITC, BEML, Granules India, Bank of Baroda आणि Hindustan Aeronautics कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक केली आहे.
गुंतवणूकदारांचा कल
जागतिक भौगोलिक परिस्थितीवरून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात,अशी माहिती बाजारातील तज्ज्ञांनी दिली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, बॉण्ड यील्डचे वाढते दर, तसेच जगभरात वाढत असलेल्या कर्जाचे व्याज दर आणि मोठ्या शेअर्समधील वाढलेल्या मूल्यांकनामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री सुरू केली आहे. मात्र, त्याचवेळी काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक वाढल्याचेही पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक थीमवर आधारित आहे. उदाहरणार्थ कच्चा तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे तसेच वस्तूंच्या किमती वाढत असल्यामुळ वीज आणि तेल कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. युद्धामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो म्हणून खत कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवण्यात आली आहे.